अमित शहा कधीपासून पंचांग पहायला लागले? - शरद पवारांचा टोला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

कोणी किती दिवस सत्तेवर रहायचे, याचा निर्णय जनता करेल. 

पुणे / कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता राहील, असे विधान नुकतेच केले आहे. त्यावर टोला लगवताना अमित शहांनी भविष्य सांगण्याचा "नवीन व्यवसाय' कधी सुरु केला?, असा सवाल खासदार शरद पवार यांनी केला आहे. 

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पवार यांना अमित शहांच्या दाव्याविषयी विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले की, ते कधीपासून पंचांग पहायला लागले? हा व्यवसाय त्यांनी कधीपासून सुरु केला? कोणी किती दिवस सत्तेवर रहायचे, याचा निर्णय जनता करेल. 

मग खोतांचं योगदान काय?
"राजू शेट्टींचे लोकसभेतील काम दिसते. मात्र दुसरे (सदाभाऊ खोत) कोण माहित नाहीत, त्यांचे योगदान काय?', असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना टोला लगावला. 

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत असताना पवारांना शेट्टी व खोत यांच्यातील वादाविषयी विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले,"शेट्टींचे काम लोकसभेत दिसते. दुसरे नाव जे तुम्ही घेतले त्यांचे योगदान काय? त्यांनु कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या? ते कोणत्या दवाखान्यात ऍडमिट होते?' 

गेले चार महिने सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील संघर्षावर पवारांनी केलेली कॉमेंट फार बोलकी आहे. 
पवार व शेट्टी यांच्यात सातत्याने संघर्ष होत आला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शेट्टींनी भाजपला टार्गेट करण्यास सुरवात केली आहे. ते एनडीएतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. काही दिवसांपुर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक़्रमात शेट्टींना शेतकऱ्यांची अधिक जाण कुणाला, असा प्रश्‍न विचारुन त्यांना मोदी की पवार, असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यावर शेट्टींनी "पवार' असे उत्तर दिले होते. त्यानंतर लगेच सदाभाऊ खोत यांनी पवारांमुळे आत्महत्त्याग्रस्त राज्य झाल्याची टीका केली होती. यापार्श्‍वभूमीवर ही कॉमेंट पाहणे महत्त्वाचे आहे. 

Web Title: marathi news sharad pawar dig at amit shah