बैलगाडी वानांवर कारवाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी वानांवर प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरु केली आहे.

मोहोळ - राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी वानांवर प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरु केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनानुसार आतापर्यंत 69 जणांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविल्याची माहिती पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकुंद शिंदे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सध्या जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, कारखान्यांना ट्रॅक्टर, ट्रक, व बैल गाडीच्या माध्यमातून गाळपासाठी उस वाहतूक केली जाते. मध्यंतरी आरटीओ कार्यालयाने क्षमतेपेक्षा ज्यादा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली होती.

आता विशेष पोलिस निरीक्षक नांगरे पाटिल यांनी मुक्या जनावरांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. बैलगाडीवान बैलगाडीत बैलांच्या क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करतात. त्यामुळे बैलांना त्रास होतो. तसेच त्यांच्या मानेच्या बाजूला खिळे लावल्याने बैल जखमी होतो. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार केला जातो. हा धागा धरून नांगरे पाटिल यांनी 10 सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. त्याचे कामकाज पथक प्रमुख मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरु आहे. ज्या भागातून बैलगाडीमार्फत कारखान्याकडे उस वाहतूक केली जाते, त्या मार्गावर जाऊन हे पथक कारवाई करत आहेत.
या ठिकाणी केली कारवाई - (कंसातील आकडे गुन्ह्यांचे)
मोहोळ- (15), कामती- (5), मंगळवेढा- (24), पंढरपुर- (25)
एकूण - 69.

Web Title: marathi news solapur bullcart police action order vishwas nangare patil