"नवोपक्रम' स्पर्धाही आता ऑनलाइन 

"नवोपक्रम' स्पर्धाही आता ऑनलाइन 

सोलापूर - शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रामुख्याने ऑनलाइन कामावर भर दिला जात आहे. वेगवेगळ्या परीक्षाही ऑनलाइन केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांबरोबरच अधिकाऱ्यांसाठीही महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या वतीने "नवोपक्रम' स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा यंदाच्या वर्षापासून ऑनलाइन करण्याचा निर्णय विद्या प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांना त्यांनी तयार केलेल्या नवीन उपक्रमाचे सादरीकरण आता ऑनलाइन करावे लागणार आहे. 

महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या वतीने दरवर्षी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी यांच्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन केले जाते. यापूर्वी ही स्पर्धा लेखी स्वरूपात घेतली जात होती. मात्र, यंदाच्या वर्षापासून ही स्पर्धाही ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला आहे. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षणीय यंत्रणा या तीन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 

पारंपरिक अध्ययन-अध्यापनात सुधारणा करणे, शिक्षक व अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करणे, संशोधन वृत्ती वाढीस लावणे, शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणे, अधिकाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. वर्षातून केवळ एकदाच या स्पर्धेचे आयोजन केले जाते. 

या परीक्षेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर प्राथमिक व माध्यमिकच्या पाच शिक्षकांची निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरावर निवड केलेले "नवोपक्रम' राज्यस्तरासाठी पाठविले जातात. राज्यस्तरावर प्राथमिक व माध्यमिकच्या पाच "नवोपक्रमांना' पारितोषिके दिली जातात. 

या लिंकवर करावे अर्ज 
शिक्षक ते अधिकाऱ्यांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी  www.maa.ac.in/innovation2018 या लिंकवर आपले नवोपक्रम ऑनलाइन अपलोड करायचे आहेत. फेब्रुवारीअखेरपर्यंत ऑनलाइन नवोपक्रम सादर करता येतील. निवडलेला शोधनिबंध हा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारा असावा, असेही विद्या प्राधिकरणाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com