मोहोळ शहराची पाणी समस्या संपवणारी योजना मंजुरीसाठी जीवन प्राधिकरणाकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

मोहोळ शहरात नगर परिषद प्रशासनाने आष्टी जलाशयातून वीस कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना तयार केली गेली आहे. ही योजना तांत्रिक मंजुरीसाठी सांगली येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविली आहे. 

मोहोळ - मोहोळ शहराची वाढती लोकसंख्या व वाढती पाण्याची मागणी या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकालात निघावा यासाठी नगर परिषद प्रशासनाने आष्टी जलाशयातून वीस कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना तयार केली गेली आहे. ही योजना तांत्रिक मंजुरीसाठी सांगली येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविल्याची माहिती नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना दिली. त्या अनुषंगाने जागेची पाहणी करण्यात आली आहे. 
         
सुमारे चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ शहराला कायम पिण्याच्या पाण्याची अडचण भासत असते ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी शहरवासीयांना भटकंती करावी लागते. याच अनुषंगाने आमदार रमेश कदम यांनीही पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला होता. सध्या शहराला आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातुन पाणी पुरवठा केला जातो. मात्र बंधाऱ्यातील पाणी संपले की पुन्हा शहरवासीयांचे हाल सुरू होतात. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष बारसकर यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून आष्टी जलाशयातून पाण्याचे नियोजन करून एकोणीस कोटी सत्त्यानव लाखाची पाणी पुरवठा योजना तयार केली. ती सांगली येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठविली आहे. यात बावीस किमी जलवाहिनी नवीन जलशुद्धीकरण केंद्र साडेचार किमी शुद्ध पाण्याची जलवाहिनी तर एकशेवीस अश्वशक्तीचे दोन पंप यांचा समावेश आहे.

सन 2050 पर्यंतची सत्तेचाळीस हजार लोकसंख्या व माणशी सत्तर लीटर पाणी गृहीत धरून ही योजना तयार केली आहे. यावेळी जागेची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक अभियंता के. एन. नदाफ पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अमीत लोमटे, ठेकेदार तनपुरे, नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचे कोंडीबा देशमुख, यशवंत रसाळ उपस्थित होते. 

Web Title: marathi news solapur mohol city water supply scheme start