सोलापूर महापालिकेत  "अंदाजपत्रका" चे त्रांगडे 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 22 मार्च 2018

सोलापूर - स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत मांडण्याचा प्रयत्न नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला, मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांनी स्थायी समितीकडे अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला. त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सोलापूर - स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत मांडण्याचा प्रयत्न नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला, मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांनी स्थायी समितीकडे अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला. त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पुरेसे सदस्य नसल्यामुळे नाशिकमध्ये स्थायी समिती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मुंढे यांनी अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविले. दरम्यानच्या कालावधीत समिती अस्तित्वात आली, त्यामुळे सभेत अंदाजपत्रक सादर करण्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा समितीकडे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. अधिनियमातील तरतूद 35 अ नुसार सभापतिपद रिक्त असेल तर हंगामी सभापती नियुक्त करून त्यावर निर्णय घेता येऊ शकतो. तत्कालीन स्थितीत नाशिकमध्ये फक्त तीनच सदस्य समितीत होते. त्यामुळे हंगामी सभापती नियुक्त करण्यातही अडचणी होत्या. परिणामी मुंढे यांनी अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविले होते. सोलापुरात उलटी स्थिती आहे. समितीत 16 सदस्य आहेत. त्यांच्यातून एक हंगामी सभापती निवडून अंदाजपत्रक प्रस्तावावर निर्णय घेता येऊ शकतो. मात्र, त्यानुसार कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. हंगामी सभापती नियुक्त करून समितीत वेळेत निर्णय झाला, तर पालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षीप्रमाणे वेळेत म्हणजे 31 मार्चपर्यंत होऊ शकते. मात्र, त्यासाठी गरज आहे सर्वपक्षीय एकमताची. सभापतिपदाचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. त्याचा निकाल कधी लागेल, हे अजूनही सांगता येत नाही. 

कायद्याच्या चौकटीत बसून हंगामी सभापती अंदाजपत्रकीय सभेसह सर्व विषयांसाठीही नियुक्त करता येत असेल तर त्यास आमची तयारी आहे. शेवटी शहराचा विकास महत्त्वाचा आहे. 
- संजय कोळी,  पक्षनेता, भाजप 

हंगामी सभापती नियुक्त केला तर अनेक तांत्रिक प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात. निर्णयावेळी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयाच्या निकालापर्यंत वाट पाहणे योग्य ठरेल. 
- महेश कोठे,  विरोधी पक्षनेता 

अंदाजपत्रक वेळेत होण्यासाठी आणि शहर विकासाचे प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी हंगामी सभापती निवडीसाठी कॉंग्रेसचे सहकार्य असेल. 
- चेतन नरोटे,  गटनेता, कॉंग्रेस 

गेल्या वर्षी अंदाजपत्रकाला उशीर झाला होता. यंदा तरी ते वेळेत व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हंगामी सभापती नियुक्तीने हा प्रश्‍न मार्गी लागत असेल तर आमची तयारी आहे. 
- आनंद चंदनशिवे,  गटनेता, बसप

Web Title: marathi news solapur municipal corporation budget