सोलापुरात 18 लाखांच्या बनावट नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

दुरुगकर हा मंत्रालयात शिपाई म्हणून हंगामी कामगार म्हणून कामाला होता. तो निवृत्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या 10 वर्षांपासून तो बनावट नोटा व्यवहारात आणण्यासाठी लोकांना गाठत होता. पहिल्या भेटीत खरी नोट दाखवून तो विश्‍वास संपादन करायचा. एक लाख रुपये दिल्यावर तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याचे सांगून तो लोकांना गंडा घालत असे.

सोलापूर : एक लाख रुपये दिल्यावर तीन लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडविणाऱ्या जियाउद्दीन अमीनसाब दुरुगकर (वय 60, रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 18 लाख 40 हजारांज्या बनावट नोटांसह कलर प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

दुरुगकर हा मंत्रालयात शिपाई म्हणून हंगामी कामगार म्हणून कामाला होता. तो निवृत्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या 10 वर्षांपासून तो बनावट नोटा व्यवहारात आणण्यासाठी लोकांना गाठत होता. पहिल्या भेटीत खरी नोट दाखवून तो विश्‍वास संपादन करायचा. एक लाख रुपये दिल्यावर तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याचे सांगून तो लोकांना गंडवायचा. नोटांचा व्यवहार चालू असताना पोलिसांनी छापा टाकल्याचा बनाव करून बनावट आणि खऱ्या नोटांसह पसार व्हायचा. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या साथीदारांचा शोध चालू आहे. 

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दुरुगकर याच्याशी नोटांचा व्यवहार करण्यासाठी पोलिस लॉजवर साध्या वेशात गेले. त्याने खऱ्या नोटा दाखवून विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.  संशय आल्यानंतर त्याने नोटा आणतो म्हणून पळ काढला. पोलिसांनी शुक्रवार पेठेतील त्याच्या घरी छापा टाकून कलर प्रिंटर, स्कॅनर, त्यासाठी लागणार कागद, दोन हजार आणि 500 रुपये प्रिंट केलेले 367 कागद जप्त केले. 

ही कामगिरी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलिस उपनिरीक्षक भीमसेन जाधव, पोलिस कर्मचारी नीलकंठ तोटदार, संजय बायस, संजय पवार, बाबर कोतवाल, अप्पासाहेब पवार, संतोष पापडे, उमेश सावंत, राहुल गायकवाड, नागेश उडानशिवे, आयेशा फुलारी, पूजा कोळेकर, आरती यादव यांनी पार पाडली. 

आजवर अनेकांना गंडविले 

बनावट नोटांचा व्यवहार करताना पोलिसांनी छापा टाकल्याचा बनाव करून जियाउद्दीन दुरुगकर पळ काढायचा. गेल्या 10 वर्षांपासून तो हा धंदा करत होता. बनावट नोटा घेण्यासाठी ग्राहक आणणाऱ्या व्यक्तीला तो 40 टक्के कमिशन द्यायचा, असे तपासात समोर आले.

Web Title: Marathi news Solapur News fake notes forfeited