रात्रीचे भारनियमन बंद करावे ; मोहोळ येथील शेतकऱ्यांची मागणी

राजकुमार  शहा
शुक्रवार, 2 मार्च 2018

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. दिवसा उन्ह असल्यामुळे जुन्या परंपरेनुसार अनेक शेतकरी ज्वारी काढणीची कामे रात्री चांदण्यात करतात. सध्या शेतात उभ्या असलेल्या ऊस, मका, भुईमुग या पिकांना विद्युत पुरवठा रात्रीचा असल्याने त्याचवेळी पाणी द्यावे लागते.

मोहोळ : मोहोळ तालुक्यात सध्या सुरू असलेले महावितरणचे रात्रीचे भारनियमन शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना सर्पदंशाची बाधा झाली असून, यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण अशी विचारणा होत आहे. त्यामुळे रात्रीचे भारनियमन त्वरीत बंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. दिवसा उन्ह असल्यामुळे जुन्या परंपरेनुसार अनेक शेतकरी ज्वारी काढणीची कामे रात्री चांदण्यात करतात. सध्या शेतात उभ्या असलेल्या ऊस, मका, भुईमुग या पिकांना विद्युत पुरवठा रात्रीचा असल्याने त्याचवेळी पाणी द्यावे लागते. सध्या काही भागांत रात्री विद्युत पुरवठा सुरू होतो आणि सकाळी बंद केला जातो. तर काही भागांत मध्यरात्री येऊन पहाटे बंद होतो. त्यामुळे जेव्हा विद्युत पुरवठा सुरू होईल त्याचवेळी पिकांना पाणी द्यावे लागते. ज्यांच्या कुटुंबात सदस्य संख्या कमी आहे, अशा लोकांची मोठी अडचण होत आहे. 

जमिनीला पडलेल्या भेगा खोल असल्याने त्यामध्ये थंडावा असतो. या थंडाव्यामुळे भेगात साप-विंचू अशा विषारी प्राण्यांची राहुटी असते. मात्र, याची कल्पना शेतकऱ्यांना नसते. रात्री पाणी देताना त्या भेगांत पाणी शिरले. त्यातून हे पाणी बाहेर येत असते. दारे बांधताना शेतकऱ्याच्या पायाची हालचाल झाली की सर्पदंश होण्याची दाट शक्यता असते तर अनेक शेतकऱ्यांच्या पाया जवळून साप जात असल्याचे अनेकदा भीतीचे वातावरण निर्माण होते. 

सर्वच शेतकऱ्यांनी दिवसा विद्युत पुरवठयाची मागणी केली तर ती शक्य होणार नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी वेळापत्रक ठरवले तर त्यात निश्चित बदल केला जाऊ शकतो. गेल्या आठवडयात लांबोटी (ता. मोहोळ) येथील संतोष खताळ शिरापूर येथील द. ता. मसलकर भीमराव घरबुडे, कृष्णकांत चव्हाण या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना सर्पदंश झाला. मात्र, तातडीने उपचार मिळाल्याने यातील कोणी दगावले नाही या सर्व बाबी विचारात घेतल्या तर रात्रीची लाईट शेतकऱ्यांना जीवघेणी ठरत आहे.

Web Title: Marathi News Solapur News Load Shedding Farmers in tension