उद्‌घाटनाला मोदी नसल्याचा अभिजात दर्जा घोषणेवर परिणाम

रजनीश जोशी
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

बडोद्याचे सोलापूरचे सर्वाधिक प्रतिनिधीत्व
बडोदा येथील साहित्य संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सोलापूर जिल्ह्याचे सर्वाधिक प्रतिनिधीत्व मिळाले आहे. शिवाजी सातपुते (मंगळवेढा) आणि बदीउज्जमा बिराजदार (सोलापूर) यांचा काव्यसंमेलनात सहभाग आहे. तर सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक कवी सुनील शिनखेडे यांचा "संत कवयित्रीं'वरील परिसंवादात सहभाग आहे.

सोलापूर : बडोद्याला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असते तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा होऊ शकली असती, असे मत अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्याच्या मुद्‌द्‌यावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. स्थानिक संयोजक संस्थेने सुरक्षेच्या कारण पुढे केले असले तरी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान न देण्यावर एकमत झाले आहे. तथापि, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा अहवाल प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या समितीने सुपूर्त केला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनीही ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर श्री. कुलकर्णी म्हणाले, मराठी अभिजात भाषा अहवालास पंतप्रधान कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळणे बाकी आहे. पंतप्रधान बडोद्यात आले असते तर हे काम त्वरेने होण्यास मदत झाली असती.

मराठी अभिजात दर्जाची असल्याचे सिद्ध करण्यासाठी दबाव गट आणि सतत पाठपुरावा करण्याची वेळ येते ही गोष्ट अयोग्य आहे. याबाबतीत राजकारण आणणे चुकीचे आहे. सरकारने याबाबतची घोषणा तातडीने करावी.
- ऍड. धनंजय माने, साहित्य रसिक, सोलापूर

पंतप्रधानांचे गुरू क्षेत्रीय संघप्रचारक लक्ष्मणराव इनामदार हे मराठी असल्याने त्यांना मराठीबद्दल आत्मीयता आहे. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही आडकाठी येणार नाही.
- सुधीर देव, साहित्यरसिक, सोलापूर

बडोद्याचे सोलापूरचे सर्वाधिक प्रतिनिधीत्व
बडोदा येथील साहित्य संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सोलापूर जिल्ह्याचे सर्वाधिक प्रतिनिधीत्व मिळाले आहे. शिवाजी सातपुते (मंगळवेढा) आणि बदीउज्जमा बिराजदार (सोलापूर) यांचा काव्यसंमेलनात सहभाग आहे. तर सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक कवी सुनील शिनखेडे यांचा "संत कवयित्रीं'वरील परिसंवादात सहभाग आहे.

Web Title: Marathi news Solapur news marathi language