सोलापूर: महापालिकेत भाजपसमोर शिवसेनेचे आव्हान

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

..तर चिठ्ठी काढून होईल निवड 
भाजप आणि विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर दोघांचे पक्षीय बल प्रत्येकी आठ होईल. निवडणूक कामकाजाच्या तरतुदीनुसार, समसमान मते पडल्यास, सभागृह ठरवेल त्या सदस्याच्या हस्ते रिंगणातील उमेदवारांपैकी एकाची चिठ्ठी काढण्यात येईल. ज्या उमेदवाराचे नाव निघेल तो निवडून आला असे जाहीर केले जाईल, असे नमूद आहे.

सोलापूर : महापालिकेची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपसमोर आव्हान असणार आहे ते शिवसेनेच्या गणेश वानकर यांचे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, सभापतीची निवड शनिवारी (ता. 3) सकाळी 10.30 वाजता होणार असून, त्यासाठी गुरुवारी (ता. 1) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 

स्थायी समितीमध्ये भाजपचे आठ, शिवसेनेचे तीन, कॉंग्रेसचे दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम व बसपचा प्रत्येकी एक सदस्य आहे. शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. पक्षीय बलानुसार सत्ताधारी आठ आणि विरोधक आठ अशी स्थिती आहे. त्यामुळे सभापतिपदासाठीची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
भाजपकडून सहकारमंत्री गटाचे नागेश वल्याळ व श्रीनिवास करली यांची नावे आघाडीवर आहेत, तर पालकमंत्री गटातर्फे राजेश्री कणके व विनायक वीटकर यांच्या नावांची चर्चा आहे. सभापतिपद सहकारमंत्री गटाला गेले तर पालकमंत्री गटाचे सदस्य उपस्थित राहतील का, याबाबत आतापासूनच साशंकता व्यक्त होत आहे. त्याचा फायदा घेत शिवसेनेकडून योग्य उमेदवार मिळाल्यास विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांचा पाठिंबा मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडून विठ्ठल कोटांचे नाव येणार की श्री. वानकर यांचे, त्यावर इतर विरोधकांची भूमिका ठरणार आहे. 

श्री. वानकर यांचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्याशी घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे भाजपकडून सहकारमंत्री गटाला उमेदवारी मिळाली, तर त्याचा फायदा श्री. वानकर यांना होऊ शकतो. कॉंग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बसपचे सदस्यही शिवसेनेच्या पाठीशी राहू शकतात. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गटाचे सदस्य उपस्थित राहतील का, याबाबत आतापासूनच तर्क-वितर्क लढविले जात आहेत. एकूणच, शिवसेनेचा उमेदवार कोण असणार आहे, त्यावरच स्थायी समिती सभापती निवडणुकीतील घडामोडी होणार आहेत. 

..तर चिठ्ठी काढून होईल निवड 
भाजप आणि विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर दोघांचे पक्षीय बल प्रत्येकी आठ होईल. निवडणूक कामकाजाच्या तरतुदीनुसार, समसमान मते पडल्यास, सभागृह ठरवेल त्या सदस्याच्या हस्ते रिंगणातील उमेदवारांपैकी एकाची चिठ्ठी काढण्यात येईल. ज्या उमेदवाराचे नाव निघेल तो निवडून आला असे जाहीर केले जाईल, असे नमूद आहे.

Web Title: Marathi news Solapur news municipal corporation BJP Shivsena