पाच हजार संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

सोलापूर - 'राज्यातील महिला बचत गट, विकास सोसायट्या आणि शेतकरी कंपन्या यांसारख्या सुमारे पाच हजार संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यासाठी शेतीपूरक उद्योग आणि फळे व भाजीपाल्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मूल्यवर्धनाची ही साखळी आवश्‍यक आहे,'' असे राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. 11) येथे सांगितले.

राज्य शासाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने आयोजित कृषी महोत्सव- 2018 या महोत्सवाचे उद्‌घाटन मंत्री देशमुख यांच्या हस्ते येथील होम मैदानावर झाले, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख होते. पणनमंत्री देशमुख म्हणाले, 'शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. बाहेरचं पाहून आल्याशिवाय आपल्याला शेती करता येणार नाही, दुसऱ्याच्या अनुकरणानेच आपल्याला काही करता येईल, त्यासाठीच हा महोत्सव भरवला आहे.

शेतमालाच्या उत्पादनापेक्षा मार्केटिंग, विक्रीला महत्त्व आले आहे. शेतकरी नेमका इथेच कमी पडतो. पणन मंडळाकडून त्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. थेट विक्री व्यवस्था, खुले व्यवहार, नियमनमुक्ती, आठवडे बाजार यांसारखे उपक्रम त्याचाच भाग आहेत.

आता तर शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याबाबत सरकार विचार करते आहे. पण, बाजाराची गरज लक्षात घेऊन उत्पादन करायला हवे. आज सेंद्रिय शेती उत्पादनांना सर्वाधिक मागणी आहे.

भविष्यात सेंद्रिय शेतीला चांगले दिवस आहेत, हे लक्षात घेऊन आतापासूनच सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. फळे व भाजीपाल्यावरील प्रक्रियेतून मूल्यवर्धन वाढवले पाहिजे. कमी खर्च, शाश्‍वत उत्पन्न देणारी किफायतशीर शेती करायला हवी. सेंद्रिय शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो.''

...अन्‌ "ज्ञानेश्‍वरां'नी दिली प्रेरणा
पुण्याच्या अभिनव फार्मर्स क्‍लबचे प्रमुख ज्ञानेश्‍वर बोडके यांनी त्यांच्या गावात केलेले कार्य सांगितले. शेतकरी नेमका कुठे कमी पडतो, सरकारची मदत काय हवी आहे, या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी खुमासदार शैलीत प्रकाश टाकला. त्याशिवाय त्यांच्या गावातील शेती, पूरक उद्योग, प्रक्रिया या अनुषंगाने त्यांचे कार्य आणि त्यात सामावलेल्या शेतकऱ्यांची आजची बदललेली परिस्थिती यावर अतिशय रंजकपणे, साध्या- सोप्या भाषेत त्यामागचे रहस्य सांगितले. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून उपस्थितांना चांगलीच प्रेरणा मिळाली.

Web Title: marathi news solapur news organisation financial condition subhash deshmukh