सोलापूर महापालिका बांधणार प्लॅस्टिकचा रस्ता

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 6 जानेवारी 2018

हा आहे सरकारचा आदेश 
रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी व शहरातील भंगार प्लॅस्टिकची विल्हेवाट लागावी, या हेतूने केंद्रीय रस्ते मंत्रालयाने नोव्हेंबर 2015 मध्ये आदेश काढला आहे. त्यामध्ये शहरात डांबरी रस्ते बांधताना बिच्युमनसोबत प्लॅस्टिक भंगाराचाही वापर करणे बंधनकारक आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. 

सोलापूर : प्लॅस्टिकच्या वापरातून टिकाऊ रस्त्यांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे शहरातील रस्ते बांधताना प्लॅस्टिकचा वापर करण्याचा आदेश केंद्र शासनाने दिला होता. त्यानुसार महापालिका लवकरच एका रस्त्याची बांधणी प्लॅस्टिकच्या मिश्रणातून करणार आहे. 

प्लॅस्टिक कचरा वाढत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. मात्र, टाकाऊ प्लॅस्टिकचा डांबरीकरणात वापर करून रस्ते टिकाऊ व मजबूत करणे शक्‍य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्याची दखल घेत केंद्र शासनाने हा आदेश काढला होता. अनेक देशांत डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर करून टिकाऊ रस्ते तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. तमिळनाडूमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकपासून रस्ते तयार केले आहेत. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात सरकारने प्लॅस्टिकचा डांबरीकरणात वापर करून रस्ते तयार केले आहेत. 

हा आहे सरकारचा आदेश 
रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी व शहरातील भंगार प्लॅस्टिकची विल्हेवाट लागावी, या हेतूने केंद्रीय रस्ते मंत्रालयाने नोव्हेंबर 2015 मध्ये आदेश काढला आहे. त्यामध्ये शहरात डांबरी रस्ते बांधताना बिच्युमनसोबत प्लॅस्टिक भंगाराचाही वापर करणे बंधनकारक आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. 

प्लॅस्टिक रस्त्यांबाबत तज्ज्ञांचे निष्कर्ष - 
- पावसाळ्यात डांबराचा थर उखडला जातो व हळूहळू रस्त्याला खड्डे पडतात. 
- प्लॅस्टिकमिश्रित रस्त्यांमधील पॉलिमरमुळे रस्ता निसरडा होण्याचा धोका कमी आहे. 
- रस्त्याला लागणाऱ्या एकूण प्रमाणात 10 टक्के प्लास्टिक मिसळल्यास रस्त्याची ताकद वाढते. 

सोलापूर शहरातील रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. त्यापैकी प्रायोगिक एक रस्ता हा प्लॅस्टिकचा वापर करून केला जाणार आहे. 
- लक्ष्मण चलवादी, नगर अभियंता 

अतिशय चांगला निर्णय. प्लॅस्टिकच्या वापरामुळे रस्ते टिकाऊ होतील, शिवाय प्लॅस्टिक समस्येतून मुक्तीही मिळेल. आर्थिकदृष्ट्या परवडणारे रस्ते होतील. 
- डॉ. निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक

Web Title: Marathi news Solapur news plastic road in Solapur