ट्विटनंतर आला 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'चा अनुभव!

police
police

सोलापूर : अपघात असो वा दगडफेक .. लोक नेहमीच पोलिसांच्या नावाने शिमगा करत असल्याचे आपण पाहतो. पोलिस कधीच वेळेवर मदतीला येत नाहीत असा आरोपही केला जातो! मध्यरात्री चालू असलेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत सोलापुरातील तरुण चेतन शर्मा यांनी केलेल्या ट्विटनंतर "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'चा अनुभव आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढविला आणि परिस्थितीवर नियंत्रण आणले. याबाबत चेतन यांनी सोशल मीडीयावरुन जाहीर आभार मानले आहेत. 

सामाजिक कार्यकर्ते चेतन शर्मा हे पाच दिवसांपूर्वी सोलापूरहून जालन्याला ट्रॅव्हल्समधून निघाले होते. बस भरलेली असल्यामुळे काही किलोमीटरचा प्रवास त्यांना चालकाच्या केबिनमध्ये बसून करावा लागला. तुळजापूरमध्ये रात्री एकच्या सुमारास काही तरुण वाहनांवर दगडफेक करत असल्याची माहिती बस चालकास मोबाईलवरून कळाली. चेतन यांनी घटनेची पूर्ण चौकशी केली आणि बस तुळजापूरमध्ये न वळवता थेट बायपासने उस्मानाबादकडे नेण्याचा सल्ला दिला. दरम्यानच्या काळात चेतन यांनी ट्‌विट करून दगडफेकीच्या घटनेची माहिती महाराष्ट्र पोलिस व मुंबई पोलिस यांना कळवली. काही वेळातच मुंबई पोलिसांचा रिप्लाय आला. चेतन यांचा मोबाईल क्रमांक घेऊन पोलिसांनी संपर्क केला. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चेतन यांच्याकडून संबंधित घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी दगडफेकीच्या घटनेची माहिती उस्मानाबाद पोलिसांना कळविली. दहा मिनिटांनी चेतन यांना पुन्हा एक फोन आला. "साहेब पीएसआय शिंदे बोलतोय, आत्ताच आम्हाला मुंबई ऑफिसमधून तक्रार आलीय, कृपया घटनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल का?' संपूर्ण माहिती घेतल्यानंतर धन्यवाद म्हणून पोलिस अधिकाऱ्याने फोन ठेवला. पुन्हा 15 मिनिटांनी आणखी एक फोन आला. "साहेब, हवालदार सय्यद बोलतोय.. मी घटनास्थळी आलोय, तुम्ही कुठे आहात?' आम्ही बायपासने पुढे निघालोय असे चेतन यांनी त्यांना सांगितले. "घटनास्थळी आम्ही बंदोबस्त लावला आहे, आता परिस्थिती शांत आहे..' असे हवालदार सय्यद यांनी कळविले. 

या घटनेनंतर चेतन यांनी पोलिसांचे आभार मानत फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. मध्यरात्रीच्या दीडच्या सुमारास एका ट्‌विटची दखल घेऊन पोलिसांनी बंदोबस्त लावला. समाजात शांतता राहावी, तेढ निर्माण होऊ नये, प्रत्येकजण गुण्यागोविंदाने नांदावा यासाठी पोलिसांनी माझ्या ट्‌विटची दखल घेऊन आपले कर्तव्य बजावले असे चेतन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

पोलिसांना सलाम! 
"हेच ते वर्दीवाले ज्यांना आपण वेगवेगळ्या नावाने संबोधून, कॉमेंट पास करून त्यांचा अपमान करतो, मित्रांनो त्या खाकी वर्दी मधल्या माणसाला जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जाणून घ्याल, तेव्हा तुम्हाला त्यांच्यातील माणुसकी दिसेल. सलाम त्या महाराष्ट्र पोलिसांना ज्यांनी मागील काही दिवसात शांतता राहावी, यासाठी अहोरात्र दक्ष राहून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. सलाम त्या मुंबई पोलिसांना ज्यांनी मध्यरात्री देखील ट्विटची दखल घेतली. सलाम त्या हवालदाराला ज्यांनी बंदोबस्त लावल्याची माहिती देण्यासाठी रात्री दीड वाजता कॉल केला. सलाम अशा अनेक पोलिसांना ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांचे कुटुंब सुरक्षित ठेवले. सलाम माझ्या त्या सर्व पोलिस मित्रांना ज्यांनी स्वतःची पर्वा न करता, दुसऱ्यांच्या रक्षणासाठी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली. त्या रात्री खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलिसांच्या तत्परतेने दर्शन झाले.' अशी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी भावना चेतन शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com