राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात 'व्हर्च्युअल क्‍लासरूम'

परशुराम कोकणे
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

''पोलिसांना प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना आवश्‍यक असणारे ज्ञान आम्ही प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देत आहोत. गेल्या 3-4 वर्षांत पोलिस प्रशिक्षण केंद्रात व्हर्च्युअल क्‍लासरूमसह अनेक चांगले बदल झाले आहेत. पोलिस ठाणे पातळीवर नेमके कसे काम चालते, संगणकावर मराठी टायपिंग कसे करावे. यांसह गुन्ह्याचा पंचनामा, तपास कसा करावा याचे प्रात्यक्षिकही दिले जात आहे''. 

- कविता नेरकर-पवार, प्राचार्या, केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्र

सोलापूर : पोलिस आणि जनता यांच्यातील संवाद अधिक चांगला व्हावा, कायदा सुव्यवस्था राखताना अडचणी येऊ नयेत यासाठी आता पोलिस प्रशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमात भावनिक प्रज्ञावंत पोलिस (इमोशनल इंटेलिजन्स) हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच नाशिकमधील पोलिस अकादमीसह राज्यभरातील दहा पोलिस प्रशिक्षण केंद्रात 'व्हर्च्युअल क्‍लासरूम'ही सुरू करण्यात आला आहे. 

राज्यात सोलापूरसह दहा ठिकाणी पोलिस प्रशिक्षण केंद्र आहेत. अप्पर पोलिस महासंचालक (पोलिस प्रशिक्षण) जगन्नाथन यांच्या पुढाकारातून सर्व प्रशिक्षण केंद्र इंटरनेटच्या सहाय्याने एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. व्हर्च्युअल क्‍लासरूममुळे मुंबई मरोळ, नाशिक, नागपूर यांसह इतर प्रशिक्षण केंद्रातून एकाच वेळी हजारो प्रशिक्षणार्थी गेस्ट लेक्‍चरचा लाभ घेऊ शकत आहेत. ही यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असून, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन होणार आहे.

केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सर्व क्‍लासरुममध्ये ही यंत्रणा जोडण्यात आली आहे. पोलिस आणि नागरिकांमध्ये संवाद कसा असावा, यासाठी भावनिक प्रज्ञावंत पोलिस (इमोशनल इंटीलिझन्स) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. संगणक हाताळणीचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. खुनासह अनेक गंभीर गुन्ह्याचा पंचनामा कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी 'क्राईम सीन' नावाचे स्वतंत्र्य वर्गही सुरू करण्यात आले आहेत.

केगाव प्रशिक्षण केंद्रात नवे बदल 

सोलापुरातील केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात यंदा 690 पुरुष प्रशिक्षणार्थी आहेत. याठिकाणी 250 क्षमतेचे नवीन वसतिगृह, 600 जणांचे डायनिंग हॉल यासह अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. प्रशिक्षणार्थींना भेटण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीयांसाठी पालक प्रतिक्षालय उभारण्यात आले आहे.

Web Title: Marathi News Solapur News Police Training Virtual Class Room