प्राथमिक शिक्षक समितीमध्ये मनोमिलन

उमेश महाजन
शुक्रवार, 9 मार्च 2018

''प्राथमिक शिक्षक समितीमधील वैचारिक मतभेद पूर्णतः मिटलेले असून, प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर काम करणारी ही संघटना एकसंघ आहे''

- काळूजी बोरसे-पाटील, माजी राज्याध्यक्ष

महूद : सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांच्या शिष्टाईमुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये पडलेल्या फुटीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवाजीराव साखरे यांना समितीच्या घटनेनुसार शिक्षक नेतेपद देण्यात आले. तर उदय शिंदे यांना राज्याध्यक्षपदी कायम ठेवून हे मनोमिलन करण्यात सोलापूरकरांना यश आले. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या दोन मोठ्या संघटनांना फुटीने घेरले असताना ही घटना प्राथमिक शिक्षकांसाठी सुखद ठरणार आहे.

प्राथमिक शिक्षक समितीमधील शिवाजीराव सारखे व उदय शिंदे या दोन्ही गटांची मनोमिलनाची बैठक सांगोला(जि.सोलापूर) येथे नुकतीच झाली. यामध्ये दोन्ही गटांनी झालेल्या सर्व घटनांवर पडदा टाकत संघटनेच्या हितासाठी प्राथमिक शिक्षक समिती अभेद्य ठेवण्याचा निर्णय घेतला. ओरस येथे प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन झाले होते. यावेळी संघटनेमध्ये राज्याध्यक्षपदावरुन दोन गट पडले होते. राज्याध्यक्षपदी साताऱ्याचे उदय शिंदे यांची झालेली निवड ही लोकशाहीला मारक आहे, असे सांगत लातूरच्या शिवाजीराव साखरे यांनी समांतर संघटनेची घोषणा करून पुण्यात काही दिवसांपूर्वी त्यांच्या संघटनेची राज्य कार्यकारणीही जाहीर केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती.

संघटनेच्या हितासाठी दोन्ही गटांचे मनोमिलन व्हावे ही भावना सर्वसामान्य शिक्षक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती. ही भावना लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने पुढाकार घेत अखेर यशस्वी शिष्टाई केली व दोन्ही गटांचे मनोमिलन करण्यात यश मिळवले.

या बैठकीत बोलताना माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे-पाटील यांनी समितीच्या घटनेनुसार त्यांच्याकडे असणारे संघटनेचे राज्य शिक्षक नेतेपदी शिवाजीराव साखरे यांची निवड केल्याचे घोषित केले. तर या मनोमिलनाने शिक्षक समितीला राज्यभरात काम करण्यासाठी बळकटी येईल, असे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी सांगितले.

राज्य शिक्षक नेतेपदी निवड झाल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना शिवाजीराव साखरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्याचे नेते अंकुश काळे यांच्या आमंत्रणावरुन या बैठकीला आलो. या शिष्टाईमध्ये 'सांगोला पॅटर्न' संपूर्णपणे यशस्वी झाला असून, येत्या काळात राज्य शिक्षक समितीसाठी पूर्णवेळ काम करणार आहे. 

या बैठकीसाठी राज्यातून जोतीराम पाटील, शंकरराव मनवाडकर(कोल्हापूर), लिलाधर ठाकरे(नागपूर), दिलीप ढाकणे(औरंगाबाद), संजय कळमकर(अहमदनगर), गिरीष नाईकडे(पुणे), महादेव लातूरे(परभणी), सुनील भामरे, आनंदा कांदळकर(नाशिक), विलास कंठकुरे(उस्मानाबाद), अरुण सोळंखी(लातूर), यू.टी.जाधव(सांगली), शिवाजी कवाळे(उस्मानाबाद), ब्रिजलाल कदम(लातूर) आदी मान्यवर होते.

सोलापूर जिल्ह्यातून या यशस्वी शिष्टाईसाठी माजी राज्य उपाध्यक्ष भिवाजी कांबळे, ज्येष्ठ नेते महादेव काशिद, जिल्हा शिक्षक समितीचे नेते अंकुश काळे, जिल्हाध्यक्ष अनिल कादे, सरचिटणीस अमोगसिध्द कोळी, सांगोला तालुकाध्यक्ष अशोक पाटील, रविकिरण कुलकर्णी, रवी पाटील, भागवत भाटेकर, निसार इनामदार, गंगाराम इमडे, बाळू अनुसे, संजय बनसोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

''प्राथमिक शिक्षक समितीच्या ५६ वर्षांच्या इतिहासात मराठवाडा, विदर्भाला संघटनेचे सर्वोच्च पद मिळाले नाही ही खंत कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र, संघटनेच्या त्याग व सेवा या संस्कारात आम्ही वाढलो आहे. पदापेक्षा संघटना मोठी असून, भविष्यात हीच संघटना आपणांस न्याय देईल. संघटनेसाठी जोमाने कार्यरत राहणार आहे''

-  शिवाजीराव सारखे, राज्य शिक्षकनेते

''सोलापूरकरांच्या प्रयत्नांमुळे शिक्षक समिती अभेद्य राहिली. प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर समिती नेहमीप्रमाणेच निष्ठेने काम करीत राहील''

- उदय शिंदे, राज्याध्यक्ष 

Web Title: Marathi News Solapur News Primary School Teachers Committee