सत्यम सत्यम... उच्चारताच चारही बाजूंनी झाला अक्षतांचा वर्षाव!

solapur
solapur

सोलापूर : रंगीबेरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला सम्मतीकट्टा... तालात वाजणारा सनई चौघडा... ना पत्रिका... ना कोणाचं बोलावणं... तरीही उत्साहाने जमलेली लाखोंची गर्दी... सर्वांच्याच मुखात ओम सिद्धरामाय नम:शिवाय...चा जाप... पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या मानकऱ्यांची लगबग.. एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ चा जयघोष... दुपारी साडेतीनची वेळ... सत्यम सत्यम... दिड्डम... दिड्डमचा उच्चार आणि चारही बाजूंनी पडलेल्या अक्षता... हे चित्र आहे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी शनिवारी लागलेल्या विवाह सोहळ्याचे. 

नंदीध्वजांच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांचे चेहरे दुपारी दोनच्या सुमारास आनंदाने खुलले. पंचरंगी ध्वजासह सातही मानाच्या नंदीध्वजांचे आगमन झाल्यानंतर डोळे मिटून हात जोडून प्रत्येकाने नमन केले. पारंपरिक वाद्यांसह नाशिक ढोलच्या दणदणाटाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला होता. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या भाविकांची लाट सम्मती कट्ट्याच्या दिशेने आली. डौलाने सम्मती कट्ट्याकडे येणाऱ्या नंदीध्वजांना स्मार्ट फोनमधील कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी भाविकांची धडपड सुरू होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी मुख्य मार्ग बंद केला होता.

दोन वर्षांच्या चिमुकलीपासून 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळ्यांच्या मुखातील एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ च्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला होता. नंदीध्वजांच्या आगमनानंतर हिरेहब्बू सिद्धेश्‍वर महाराजांच्या पूजेसाठी मंदिरात गेले. सकाळपासूनच माईकचा ताबा घेतलेल्या बसवराज शास्त्रींनी कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेतून खुमासदार शैलीत निवेदन करून सर्वांनाच खिळवून ठेवले होते. तोवर सम्मती कट्ट्यावर विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. पूजा करून परत आल्यानंतर हिरेहब्बूंनी यात्रेची थोडक्‍यात माहिती सांगितली. त्यानंतर सम्मती वाचन सुरू झाले. प्रत्येक कडव्याच्या शेवटी "सत्यम....सत्यम....' उच्चारताच अक्षतांसाठी लाखो भाविकांचे हात उंचावले. जवळपास दहा मिनिटे अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम चालला. एकाच वेळी लाखो हातांनी पडणाऱ्या अक्षतांचा हा सोहळा जणू डोळे दिपवणारा ठरला. 

अक्षता सोहळ्याला महापौर शोभा बनशेट्टी, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची आवर्जून उपस्थिती होती. 

क्षणचित्रे : 
- दुपारी अडीच वाजता नंदीध्वजांचे आगमन 
- दुपारी साडेतीन वाजता अक्षता सोहळा 
- भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 
- गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठेवली चोरट्यांवर नजर 
- लाखोंच्या गर्दीवर दहशतवाद विरोधी पथकाचे लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com