तंत्रनिकेतनमध्येही एनएसएस सक्तीचे ; प्राचार्यांकडून स्वागत

शीतलकुमार कांबळे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

महाविद्यालयांप्रमाणेच तंत्रनिकेतनमध्येही एनएसएस योजना राबविण्याचा चांगला निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. तंत्रनिकेतनसाठी अशी योजना राबविणे नवीन असलेतरी विद्यार्थी यासाठी उत्कृष्ट योगदान देतील.
- प्रा. डी. ए. कटारे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर

सोलापूर : राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित तंत्रनिकेतनमध्ये एनएसएस (राष्ट्रीय सेवा योजना) राबविणे सक्तीचे करण्यात आले. यासंबंधीच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयांना दिल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष 2017-18 या वर्षासाठी प्रत्येक संस्थेसाठी 50 विद्यार्थी संख्या व एक कार्यक्रम समन्वयक (संस्थेतील मंजूर अधिव्याख्याता) मंजूर करण्यात आलेली आहे. यासंबंधीची तंत्रनिकेतन महाविद्यालयांनी कोणती कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्यास संचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे. या योजनेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रियाशील संस्थांना शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून नियमित संस्था म्हणून शासनाकडून अतिरिक्त अनुदान वाटप करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार
आहे.

तंत्रनिकेतन वगळता इतर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात यापूर्वीपासून राष्ट्रीय सेवा योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तंत्रनिकेतन महाविद्यालयातही याचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. महाविद्यालयांनीही एनएसएससाठी
अनुकूलता दर्शविली असून, संचालनालयाकडे यासंबंधीचा अहवाल पाठविला आहे.

राष्ट्रीय सेवा योजनांमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी 120 तास समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होणे, अपेक्षित असते. मात्र, कोणत्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, याबाबत संदिग्धता होती. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा मे 2017 मध्ये कृती आराखडा तयार करण्यात आला.

 

Web Title: Marathi News Solapur News Technical Education NSS Mandatory