माता-भगिनींनो, डोन्ट वरी.. मदतीला आहे प्रतिसाद आस्क!

परशुराम कोकणे
गुरुवार, 8 मार्च 2018

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस सर्वच स्तरांवर उपलब्ध आहेत. ऍपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन काही वेळांतच मदत दिली जाते. आजवर अनेकांनी ऍपच्या माध्यमातून पोलिसांची मदत घेतली आहे. 
- कार्तिकी पतंगे, महिला पोलिस कर्मचारी

सोलापूर : छेड काढण्यासाठी कोणी पाठलाग करत असेल किंवा मग हिसका मारून मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असेल.., घरात पती किंवा अन्य सदस्यांकडून अन्याय होत असेल तर तुम्ही एका क्‍लिकवर पोलिसांची मदत मिळवू शकता. शहर आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या "प्रतिसाद आस्क' या ऍपच्या माध्यमातून काही वेळांत पोलिस मदतीला धावून येत आहेत. 

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने जग फारच जवळ आल्याचे जाणवत आहे. स्मार्टफोनचा वापर केवळ संपर्कात राहण्यासाठी किंवा मग मनोरंजनासाठी होतोय असे नाही, तर विविध ऍपच्या माध्यमातून आपणास ज्ञान आणि माहितीचा खजिना उपलब्ध झाला आहे. सोबतच पोलिस प्रशासनाने सुरू केलेल्या प्रतिसाद ऍपमुळे तर महिलांसाठी एक खास सुरक्षाकवच तयार झाले आहे. कोणत्याही संकटा वेळी महिला प्रतिसाद ऍपच्या माध्यमातून पोलिसांची मदत मिळवू शकतात. आजवर 772 जणांनी शहर पोलिसांचे ऍप डाऊनलोड करून त्या माध्यमातून पोलिसांची मदत मिळविली आहे.

या ऍपशी संबंधितच आणखी एक ऍप असून ते खास पोलिसांकरिता आहे. एखाद्या महिलेने प्रतिसाद ऍपच्या माध्यमातून मदत मागितली तर त्या भागातील पोलिसाच्या मोबाईलवर संदेश जातो. काही वेळांतच पोलिस मदतीला धाव येतात. शहरातील 859 पेक्षा अधिक पोलिसांकडे ही सुविधा आहे. नियंत्रण कक्षातील महिला पोलिस कर्मचारी कार्तिकी पतंगे, प्रियांका तेली, आशा डावखरे, आदी महिला कर्मचारी ऍपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींकडे लक्ष ठेवून असतात. ही टीम सक्षमपणे महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. यासोबतच सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांचे स्वतंत्र ऍपही नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. 

प्रतिसाद आस्क ऍपसोबतच शहरातील महिला 9423880004, 9422950003 या क्रमांकांवरील व्हॉट्‌सऍपवरही तक्रार करून पोलिसांची मदत मिळवू शकतात. वाहतुकीबाबत तक्रार असेल तर 9422970005 या क्रमांकावर व्हॉट्‌सऍप मेसेज करता येईल. तसेच नियंत्रण कक्षातील 1090 किंवा 100 या क्रमांकही उपयोगात येईल. 

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस सर्वच स्तरांवर उपलब्ध आहेत. ऍपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन काही वेळांतच मदत दिली जाते. आजवर अनेकांनी ऍपच्या माध्यमातून पोलिसांची मदत घेतली आहे. 
- कार्तिकी पतंगे, महिला पोलिस कर्मचारी

Web Title: Marathi news Solapur news women safety app police