धुणी-भांडी, घरकाम करणाऱ्या महिलांना मिळाला आधार! 

परशुराम कोकणे 
गुरुवार, 8 मार्च 2018

घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध व्यवसाय मार्गदर्शनपर कार्यक्रम, पाल्यांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विविध उपक्रमांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांसोबत आता आमचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. 
- आशाराणी डोके, अध्यक्षा, ऍचिव्हर्स महिला असोसिएशन

सोलापूर : स्वत:चं घर चालावं म्हणून दुसऱ्यांच्या घरांत धुणी-भांडी, झाडलोट, स्वयंपाक करणाऱ्या महिला अनेक ठिकाणी दिसून येतात. घरगुती अडचणींमुळे अनेक महिला दु:खी आयुष्य जगत असल्याचेही आपण पाहतो. काम करताना अनेक महिला कामगार आपलं रडगाणं सांगत असतात. अशा महिलांच्या अडचणी जाणून घेऊन काही सकारात्मक मार्ग काढता येईल का? या विचाराने सोलापुरातील महिला शिक्षिका एकत्र आल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ऍचिव्हर्स महिला असोसिएशनच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सकारात्मक काम चालू आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन इतरांसारखंच आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच अनेक उपक्रम गेल्या वर्षभरात राबविण्यात आले आहेत. 

दुसऱ्यांच्या घरांत घरकाम करणाऱ्या महिला आजवर उपेक्षित राहिल्या आहेत. अशा महिलांना मोलकरीण म्हणून संबोधले जाते. त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. त्यांच्या अडचणी वैयक्तिक आणि घरगुती असल्या तरी त्या कोणीच ऐकून घेत नाहीत. त्यावर मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शनही होत नाही. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन करून आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देण्यात ऍचिव्हर्स महिला असोसिएशनला यश आले आहे. शांतिनगर येथील देवराज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी शाळेतील महिला शिक्षिकांना सोबत घेऊन गेल्या वर्षी असोसिएशनची स्थापना केली. 

वर्षभरात संघटनेच्या माध्यमातून सोलापुरातील घरकाम करणाऱ्या शेकडो महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. आशाराणी डोके यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्षा लक्ष्मी इराबत्ती, सचिवा शीतल ठाकूर, सरस्वती मते, नरसम्मा सारोळे, शशिकला सातपुते, संतोषी बिरादार या समविचारी महिला शिक्षिकांनी एकत्रित येऊन अनेक उपक्रमांच्या माध्यमांतून महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हळदी-कुंकू कार्यक्रमातून गृहोपयोगी साहित्यांचे वितरण, आरोग्य शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी, विविध स्पर्धांचे आयोजन, स्वच्छतेचा संदेश देत सतरंजी वाटप, विविध कल्याणकारी योजनांची माहितीही देण्यात आली आहे. 

घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध व्यवसाय मार्गदर्शनपर कार्यक्रम, पाल्यांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विविध उपक्रमांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांसोबत आता आमचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. 
- आशाराणी डोके, अध्यक्षा, ऍचिव्हर्स महिला असोसिएशन

Web Title: Marathi news Solapur news women success story