शिवसेना नगरसेवकाने धरली पोलिस निरीक्षकाची गचांडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या कारणावरुन मारहाण केल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस चौकीत गेलेल्या पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांना शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे यांनी धक्काबुक्की केली. ही घटना सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास बाळे पोलिस चौकीत घडली. 

सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या कारणावरुन मारहाण केल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस चौकीत गेलेल्या पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांना शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे यांनी धक्काबुक्की केली. ही घटना सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास बाळे पोलिस चौकीत घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी पुरुषोत्तम दिगंबर बन्ने (वय 40, रा. उत्तर कसबा, सोलापूर) हे रात्री साडेबाराच्या सुमारास हॉटेल सुयोगमधून घरी निघाले होते. नगरसेवक अमोल बाळासाहेब शिंदे यांनी बन्ने यांना अडविले. गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीच्या कारणावरुन वाद घातला. 'तू आम्हाला निवडणुकीत मदत का केली नाही, तुला मस्ती आली आहे काय' असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण केली. शर्टच्या खिशातून 1760 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. भांडणात बन्ने यांची गळ्यातील सोनसाखळी तुटली. याप्रकरणात बन्ने यांनी नगरसेवक शिंदेसह त्यांचा सहकारी सागर भैय्या आणि त्यांच्या सोबत असलेल्या आणखी एका तरुणाविरोधात फिर्याद दिली आहे. 

बाळे परिसरात झालेल्या या गोंधळाची माहिती घेण्यासाठी पोलिस निरीक्षक शहाजी पवार हे बाळे पोलिस येथे गेले. त्या ठिकाणी जखमी बन्नेसह नगरसेवक आणि त्यांचे सहकारी होते. मी नगरसेवक आहे असे म्हणून शिंदे यांनी पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांची गचांडी धरली. त्यांना भिंतीवर ढकलून दिले. त्यात पवार यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला मार लागून रक्त आले. गचांडी सोड असे म्हटल्यावर शिंदे यांनी मी नगरसेवक आहे, पवार साहेब नीट चौकशी करा, असे म्हणत धमकी दिली. पोलिसांनी नगरसेवक शिंदे यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते बार्शी चौकाकडे पळून गेले. याप्रकरणात शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news solapur police constable shivsena corporator