महिलांनी सांभाळला आयुक्तालय अन्‌ पोलिस ठाण्यांचा कारभार! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

महिला कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने महिला दिनी ठाणे अंमलदार पदाची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली होती.

सोलापूर : सगळीकडेच महिला दिनाचा उत्साह असताना पोलिस तरी यात मागे कसे राहतील. गुरुवारी सर्वच पोलिस ठाण्यांत, आयुक्तालयात गुलाबपुष्प देऊन महिला पोलिसांचे स्वागत करण्यात आले. पोलिस आयुक्तालयाचा आणि पोलिस ठाण्यांचा कारभार महिलांकडे सोपविण्यात आला होता. 

महिला कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने महिला दिनी ठाणे अंमलदार पदाची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली होती. महिला कर्मचाऱ्यांनी उत्साहाने पोलिस ठाण्यांचा कारभार सांभाळला. पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार पदाचा पदभार महत्त्वाचा समजला जातो. दिवसभरात पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घटनांची नोंद केली जाते. सदर बझार, जेलरोड, फौजदार चावडी, सलगर वस्ती, जोडभावी पेठ, एमआयडीसी, विजापूर नाका पोलिस ठाण्यांमध्ये आम्ही रोजच महिला कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कामाबद्दल सन्मान करतो. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्याकडे कार्यालयीन कामकाज सोपवून कामाचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असल्याचे सांगण्यात आले. 

पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी आयुक्त पदाचा पदभार पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांच्याकडे सोपविला होता. आयुक्त तांबडे यांनी गुलाब पुष्प देऊन उपायुक्त गिते यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

सदर बझार पोलिस ठाणेच्या हवालदार अनिता जाधव यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले, 'सकाळपासून आम्ही पोलिस ठाण्याचा कारभार उत्साहाने सांभाळला. यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे धाडस वाढलं आहे. दवाखाना नोंदी, किरकोळ गुन्ह्यांच्या नोंदी आणि लाच प्रकरणातील जुन्या गुन्ह्याची नोंद स्टेशन डायरीला केली. महिला दिनी सर्वांकडून सन्मान मिळाला.' तर जेलरोड पोलिस ठाणेच्या पोलिस नाईक वनिता शिंदे म्हणाल्या, 
'पोलिस दलात भरती होऊन आम्हाला महिलांचे प्रश्‍न सोडविण्याची संधी मिळाली आहे. आज महिला दिनी पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळून आनंद वाटला. महिला पोलिसांना रोजच सन्मान मिळतो, पण आजच्या दिवशी अधिकच छान वाटले.'

Web Title: marathi news solapur police station work women responsibility