सोलापूरकरांचे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष

traffic
traffic

सोलापूर - रस्त्यावरून वाहन चालविताना तुम्ही वाहतूक नियमांचे पालन करता का..? तुम्ही म्हणाल हो आम्ही नियम पाळतो. पण रस्त्यावर थांबून जेव्हा वाहतुकीचे निरिक्षण कराल तेव्हा वाहतूक नियमांचे कसे उल्लंघन केले जात आहे हे दिसून येईल. 60 टक्के वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्‍यात घालून वाहने चालविली जात आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत "सकाळ'ने केलेल्या निरीक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 

स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील रस्त्यांवर रोज लाखो वाहनांची वर्दळ असते. सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 हे पिक अवर आहेत. या कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकांमध्ये वाहनांची गर्दी असते. सिग्नल असलेल्या चौकात तर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येतात. "सकाळ'ने केलेल्या निरीक्षणातून अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले. पोलिसांकडून सातत्याने कारवाई करून, सूचना देऊनही वाहनधारक सुधारत नाहीत. 

कुठे चुकताहेत सोलापूरकर... 
- सिग्नल सुटण्याआधीच पुढे जाण्याची घाई 
- झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे नेतात वाहन 
- दुचाकीवर तिघे, चौघे बसतात 
- नियंत्रणात नसतो वाहनांचा वेग 
- वळण घेताना इंडिकेटरचा वापर होत नाही 

पोलिसांकडून होणारी कारवाई... 
- रॉंग साइडने वाहन चालविणे जास्त 
- मोबाईलवर बोलत वाहन चालविणे 
- दुचाकीवरून तिघे, चौघे जाणे 
- वाहन परवाना, इतर कागदपत्रे नसणे 

गर्दीचे चौक 
- शिवाजी चौक 
- डफरीन चौक 
- मार्केट यार्ड चौक 
- आसरा चौक 
- पत्रकार भवन चौक 
- शांती चौक 
- अशोक चौक

रस्त्यावर वाहन चालविताना सर्वांत पुढे जाण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. सिग्नलला थांबवल्यावर तर थोडी जागा मिळाली की गर्दीत वाहन घुसविले जाते. वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. लोकांनी स्वत:हून सुधारले पाहिजे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना रस्त्यावरील वाहतुकीमध्येही सकारात्मक बदल झाले पाहिजेत. मुंबई, पुण्यात वाहतूक नियमांचे पालन अधिक होते. त्या तुलनेत सोलापूर मागे आहे. 
- नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त

अनेक वाहनधारकांना वाहतुकीचे नियम माहिती नाहीत. वाहतुकीमध्ये चुकीचे पायंडे पाडण्यासाठी पोलिसही दोषी आहेत. अनेकदा पोलिसांसमोरच चुकीच्या दिशेने वाहने जातात पण कारवाई होत नाही. पोलिस कमी पडत आहेत, हे मान्य आहे. नियम मोडल्यावर फार तर दंडात्मक कारवाई होईल असे लोकांना वाटते. कारवाईची तीव्रता वाढविण्याची गरज आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात आम्ही शक्‍य तिथे प्रबोधन करीत आहोत. 
- गणेश शिलेदार, अध्यक्ष, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन 

हिरवा दिवा लागण्याआधीच वाहनचालक सिग्नल तोडून पुढे जातात. वाहतूक व्यवस्था बिघडण्यासाठी नागरिक आणि पोलिस प्रशासन हे दोघेही दोषी आहेत. फुटपाथावर अतिक्रमण वाढल्याने लोक रस्त्यावरून चालत जातात. स्मार्ट सिटी होत असताना महापालिकेनेही सुरक्षित वाहतुकीकडेही लक्ष द्यावे. जोपर्यंत प्रभावी पोलिसिंग होणार नाही तोवर लोक सुधारणार नाहीत. दंडाची रक्कम वाढवायला हवी. वाढवलेल्या दंडाची रक्कम स्मार्ट सिटी योजनेसाठीही वापरता येईल. 
- सचिन जोशी, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com