शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलमध्ये 'एरर'

संतोष सिरसट
शुक्रवार, 23 जून 2017

सोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी शासनाने पोर्टल तयार केले आहे. मात्र, ते पोर्टल "एरर' येत असल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. एका शिक्षकाचा अर्ज भरण्यासाठी तब्बल नऊ तासांचा अवधी लागत असल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत.

सोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी शासनाने पोर्टल तयार केले आहे. मात्र, ते पोर्टल "एरर' येत असल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. एका शिक्षकाचा अर्ज भरण्यासाठी तब्बल नऊ तासांचा अवधी लागत असल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी शासनाने 27 फेब्रुवारीला आदेश काढला आहे. त्या आदेशाला राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. त्याचबरोबर काही शिक्षक व संघटनांनी या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले आहे. एकूणच या आदेशाला शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. बदली आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात शिक्षक संघाने याचिका दाखल केली होती. त्याला 30 जूनपर्यंत "जैसे थे' स्थितीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

राज्याच्या शिक्षण विभागाने या बदल्या संदर्भात अनेक शुद्धीपत्रके काढली आहेत. त्यानंतर शेवटी शासनाने त्या बदली आदेशातील संवर्ग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी पोर्टल तयार केले. त्या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी या संवर्गातील शिक्षकांना उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. काही शिक्षक संघटनांनी कोणत्याही शिक्षकांनी माहिती भरू नये असे आवाहन केले आहे. मात्र, यामध्ये पात्र असलेले शिक्षक आपली संपूर्ण माहिती त्या पोर्टलवर भरण्यासाठी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे ते पोर्टल "एरर' येऊ लागले आहे. त्याचबरोबर एका शिक्षकाची माहिती भरण्यासाठी तब्बल आठ-नऊ तासांचा कालावधी लागत आहे. बदल्यांसाठी ऑनलाइन माहिती भरण्यासाठी शिक्षकांना रात्र जागून काढावी लागत आहे. ही माहिती भरण्यासाठी शासन मुदत वाढवून देणार का? याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिक्षकांमधील अस्वस्थतेचा विद्यार्थ्यांवर परिणाम
नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. मात्र, अद्यापही जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांचा विषय मार्गी लागला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याकडे त्यांचे लक्ष लागत नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. याबाबत शासनाने ठोस भूमिका घेऊन हा विषय मार्गी लावण्याची अपेक्षा सर्वसामान्य शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Marathi news teachers transfer issue maharashtra news