पुढारलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील 'हे' गाव आजही रस्त्याविनाच!

हेमंत पवार  
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुढारलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पाठरवाडी या गावाच्या रस्त्यासाठी अनेकदा पाठपुरावा करुनही गाव शासनाकडून रस्त्यासाठी बेदखलच झाले आहे. गावाला रस्ताच नसल्याने गावाचा विकासच खुंटला. 

कऱ्हाड - रस्ता हे दळणवळणाचे विकासातील मुख्य साधन आहे. मात्र स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर अजुनही डोंगरावर वसलेल्या पाठरवाडी गावाला रस्ताच नाही. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भैरवनाथ देवस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या पाठरवाडीची त्यामुळे परवडच सुरु आहे. रस्त्याअभावी येथील आबालवृध्दांच्या पाचवीलाच दररोजची पायपीट पुजली असुन पावसाळ्यात तर येथील लोक मरणयातनाच भोगतात. पुढारलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील या गावाच्या रस्त्यासाठी अनेकदा पाठपुरावा करुनही गाव शासनाकडून रस्त्यासाठी बेदखलच झाले आहे. गावाला रस्ताच नसल्याने गावाचा विकासच खुंटला. 

तांबवे गावच्या पश्चिमेकडील डोंगरावर पाठरवाडी गाव वसले आहे. गमेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचा एक भाग म्हणुन पाठरवाडी गणली जाते. हे गाव डोंगरावर असल्याने येथे फारशा सोयी-सुविधा नाहीत. विकासाचा मुख्य घटक असलेला रस्ताच या गावाला नाही. त्यामुळे गावच्या विकासावरही मर्यादा आल्या आहेत. तेथे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कुलदैवत भैरवनाथाचे मोठे मंदिर आहे. तेथे यात्रेसाठी दरवर्षी मोठी गर्दी असते. मात्र संबंधित भाविकांना दरवर्षी देवदर्शनासाठी पाठरवाडीच्या डोंगरावर पायी चालत जावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठी अडचण होते. त्याचबरोबर पाठरवाडीला रस्ता नसल्याने तेथील आबालवृध्दांना दैनंदिन व्यवहारासह, शिक्षण, आरोग्याच्या सेवांसाठी डोंगर उतरुन खाली असलेल्या तांबवे येथे ये-जा करावे लागते. महिलांचा प्रसुती किंवा वयोवृध्द महिला, पुरुष आजारी पडल्यावर त्यांना पाळणा किंवा झोळीतुन खांद्यावरुन डोंगर उतरुन खाली आणावे लागते व परत वर न्यावे लागते. पावसाळ्यात तर पावसाच्या उभ्या धारांत आबालवृध्दांना मरणयातनाच भोगाव्या लागतात. पुढारलेल्या म्हंटले जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील ह्या पाठरवाडीच्या रस्त्यासाठी अनेकदा पाठपुरावा करुनही हे गाव शासनाकडुन रस्त्यासाठी बेदखलच झाले आहे. संबंधित गावच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांपासुन मंत्र्यांपर्यंत अनेकांकडे पत्रव्यवहार करुनही त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. गावाला रस्ताच नसल्याने गावाचा विकासच खुंटला आहे.  

बिबट्याची नेहमीच दहशत 
पाठरवाडी हे डोंगरावर वसलेले गाव आहे. तेथे मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने त्या परिसरात असलेल्या वाघधुंडी गुहेत बिबट्याचे कायमच वास्तव्य असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी पाठरवाडीत जाताना किंवा पहाटेच्यावेळी पाठरवाडीचा डोंगर उतरुन खाली येत असताना विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना बिबट्याची चांगलीच धास्ती असते. अनेकदा बिबट्याचे राजरोस दर्शन होत असल्याने त्याच्या दहशतीतीच जीव मुठीत धरुन लोकांना तेथे रहावे लागते.   

मुलांच्या लग्नाचा प्रश्न 
पाठरवाडी हे साठ ते सत्तर हुंबरा असलेले गाव आहे. तेथील मुलांना शाळेसाठी दररोज डोंगर उतरुन खाली यावे लागते आणि परत घरी वर जावे लागते. शिक्षण घेवुन मोठे झाल्यावर नोकरी लागली तरी हे गाव डोंगरावर वसलेले असल्यामुळे येथील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत अशी स्थिती आहे. नोकरी नसलेल्यांची तर फारच वाईट स्थिती आहे.  

Web Title: marathi news western news karhad village no road available