मराठी तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

बेळगाव - अटकेत असलेल्या पाच मराठी तरुणांवर सोमवारी (ता. ७) पोलिसांनी चक्क राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.  हे कलम आताच अचानक का, असा प्रश्‍न वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारला असता एकानेही समर्पक उत्तर दिले नाही. यावरून मराठीभाषकांना दडपण्यासाठी कर्नाटक शासन कुठल्या थराला जात आहे, हे स्पष्ट होते. 

बेळगाव - अटकेत असलेल्या पाच मराठी तरुणांवर सोमवारी (ता. ७) पोलिसांनी चक्क राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.  हे कलम आताच अचानक का, असा प्रश्‍न वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारला असता एकानेही समर्पक उत्तर दिले नाही. यावरून मराठीभाषकांना दडपण्यासाठी कर्नाटक शासन कुठल्या थराला जात आहे, हे स्पष्ट होते. 

दरम्यान, पाच जणांसह ४७ जणांना सोमवारीही जामीन मिळाला नाही. यावर मंगळवारी (ता. ८) निर्णय देणार असल्याचे न्यायालयाने सांगितल्याने या तरुणांना सोमवारीही हिंडलगा कारागृहातच राहावे लागले. 
काळा दिन निषेध फेरीत सहभागी घेतलेल्या ४८ जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत.

यापैकी मार्केट पोलिसांनी एअरगन घेऊन मोर्चात सहभागी तरुणासह घोडेस्वारी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. आधीही अजामीनपात्र १५३ ‘अ’ सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतु, त्यात सोमवारी आणखी एक कलम वाढविण्यात आले.

घोड्यावर बसून काळ्या दिनात सहभागी झालेल्या तरुणांपैकी एकाच्या हातात एअरगन होती. आता जिल्हा व पोलिस प्रशासनाने त्यांना लक्ष्य केले आहे. त्याच्यासह घोडेस्वारीसह सहभागी झालेल्या या सर्वच तरुणांवर भादंवि कलम १२४ ए अन्वये गुन्हा दाखल केल्याचे पत्र न्यायालयाला सादर केले. त्यात रत्नप्रसाद लक्ष्मण पवार (वय ३२, चव्हाट गल्ली), विशाल पाटील, विनायक शिंदे, रमेश हिरोजी (तिघेही रा. गणेशपूर), विशाल कोकितकर (महाद्वार रोड) यांचा समावेश आहे. मार्केट पोलिसांकडून आलेल्या या पत्रात उपरोक्त सर्वांवर पूर्वीची जी कलमे आहेत त्यामध्ये १२४ अ अर्थात राजद्रोहाचे कलम सामील करून घेण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

‘त्यांचा’ खटला जिल्हा न्यायालयाकडे 
आधीचे एक कलम अजामीनपात्र असताना आता पुन्हा राजद्रोहाचे कलम दाखल केल्याने उपरोक्त तरुणांना जामीन मिळण्यात अडचणी वाढल्या आहेत. सरकारी वकिलांनी पोलिसांनी दिलेल्या पत्राचा आधार घेत राजद्रोहाचा खटला जेएमएफसी न्यायालयात चालवता येत नाही. तो जिल्हा मुख्य न्यायालयाकडे वर्ग करावा, असा युक्तिवाद मांडला. त्याला अनुसरून न्यायाधीशांनी तो जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केला आहे. या सर्वांच्या जामिनासाठी पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार असल्याचे ॲड. महेश बिर्जे व ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी (ता. ८) तसा अर्ज दाखल करून त्यावर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पाच जणांच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. अमर येळ्ळूरकर, ॲड. दीपक काकतीकर, ॲड. सुधीर चव्हाण व ॲड. श्‍याम पाटील काम पाहत आहेत.

अटकेतील तरुणांसाठी भोजनाची मदत
कर्नाटक पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून कारागृहात डांबलेल्या मराठी तरुणांसाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. भांदूर गल्लीतील रहिवाशांनी सोमवारी (ता. ७) या तरुणांच्या भोजनासाठी आपल्या परीने मदत केली. गल्लीतील प्रत्येक घरातून दोन भाकरी व भाजी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. तब्बल १५० भाकरी जमा झाल्या. त्या भाकरी व भाजी कारागृहात नेऊन त्या तरुणांना देण्यात आल्या. पाटील मळा व ताशीलदार गल्लीतील रहिवाशांनीही याचे अनुकरण करण्याचे ठरविले आहे. मराठी भाषा व संस्कृतीसाठी लढणाऱ्यांना आपल्या क्षमतेप्रमाणे मदत करण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

अटक केलेल्या तरुणांना अधिकाधिक दिवस कारागृहातच कसे ठेवता येईल, यासाठी पोलिसांचे हे डावपेच आहेत. तसा कुठलाही गुन्हा घडलेला नाही; परंतु जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात आहे. याला जे प्रत्युत्तर द्यायचे आहे ते न्यायालयातच देऊ. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्‍वास असून तेथे आम्हाला योग्य तो न्याय मिळेल.’ 
- ॲड. महेश बिर्जे, बचाव पक्षाचे वकील

Web Title: Marathi youth crime and sedition