मराठमोळी प्रियांका 15 मेपर्यंत ल्होत्सेला घालणार गवसणी

सिद्धार्थ लाटकर
रविवार, 6 मे 2018

ल्होत्से शिखराची चढाई 85 अंशांत आहे. निसर्गाने साथ दिल्यास येत्या आठवड्यात मी मोहीम फत्ते करीन. हे शिखर पादाक्रांत करणारी मी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरेन. 

- प्रियांका मोहिते (गिर्यारोहक)

सातारा : मला निसर्गाची उत्तम साथ लाभत आहे. सातारकरांच्या शुभेच्छा माझ्या कायम पाठीशी असल्याने येत्या 15 मेपर्यंत मी मोहीम फत्ते करीन, असा मला विश्‍वास आहे. छत्रपती शिवरायांच्या राकट गडकोटांच्या प्रदेशात जन्मलेल्या मला बर्फाळ उंच शिखरे सतत खुणावत आहेत, असे मत गिर्यारोहक प्रियांका मोहितेने ल्होत्से (नेपाळ) या शिखराच्या मार्गावरून आज 'ई- सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

मराठमोळी कन्या प्रियांका लवकरच नेपाळमधील जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर असलेल्या ल्होत्से या शिखराच्या माथ्यावर देशाचा झेंडा रोवणार आहे. 

सध्या ती सहा हजार 510 मीटर उंचीवर (कॅम्प 1 व 2) येथे पोचली आहे. तेथून तिने ई-सकाळशी संवाद साधला. प्रियांका मोहिते हे नाव महाराष्ट्रासाठी तसेच सातारकरांसाठी आता नवे नाही. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या मुलीने गिर्यारोहणाचा छंद जपत असामान्य धैर्य दाखविले आहे. जगातील सर्वांत उंच 8848 मीटर उंचीचे माउंट एव्हरेस्ट शिखर सन 2013 मध्ये सर केले होते.

त्यानंतर तिने सन 2016 मध्ये माऊंट किलीमांजारो, सन 2017 मध्ये माऊंट एलब्रुस या शिखरांवर यशस्विरित्या चढाई केली. आता प्रियांका माऊंट ल्होत्सेच्या मार्गावर आहे. समुद्रसपाटीपासून 8516 मीटर वर असणारे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शिखर आहे. या मोहिमेचा प्रारंभ 27 एप्रिलला झाला. निसर्गाची साथ लाभल्याने एकेक टप्पा पार करीत तिने आज सहा हजार 510 मीटर अंतर पार केले.

प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबाना, आप्तेष्टांना तेथील छायाचित्र शेअर करते. आजही तिने इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसऍपद्वारे मोहिमेतील कॅम्प (1 व 2) हा टप्पा पूर्ण केल्याची छायाचित्रे शेअर केली. 

दरम्यान, या मोहिमेसाठी तिला 12 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील सुमारे साडे सात लाख रुपये ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून दिले आहेत. काही रक्कम दानशूर व्यक्तींनीही दिल्या, परंतु अद्याप सुमारे चार लाख रुपयांची कमतरता भासत असल्याचे तिच्या कुटुंबीयींतून समजले.

Web Title: Marathmoli Priyanka will be attending Lohotsala by May 15