‘मराठवाडी’ला आधार कृत्रिम वाळूचा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

समन्वयाचा अभाव...
मराठवाडी धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉररूमधील प्रकल्प म्हणूनही त्याची स्वतंत्र ओळख आहे. अलीकडे येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याबरोबरच प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देताना धरणाचे बांधकाम मुदतीत पूर्ण करण्याची अटही घालण्यात आली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी शिल्लक कामांचा पसारा आणि पाटबंधारे, महसूल आणि पुनर्वसन विभागात असलेला समन्वयाचा अभाव पाहता ते मुदतीत पूर्ण होईल का, याबद्दल साशंकताच आहे.

ढेबेवाडी - गेल्या अनेक महिन्यांपासून पाटबंधारे विभागासह ठेकेदाराने वाळूसाठी मोठे प्रयत्न केले. पण, जिल्हा प्रशासनाने त्याला दाद न दिल्याने अखेर मराठवाडी प्रकल्पाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे वाळूने मारले; स्टोनक्रश सॅण्डने तारले, असाच काहीसा प्रकार येथे दिसत आहे. 

प्रकल्पग्रस्तांनी वेळोवेळी उभारलेल्या आंदोलनांमुळे मराठवाडी धरण तब्बल २२ वर्षे राज्यभर चर्चेत आहे. २.७३ टीएमसी पाणीसाठवण क्षमतेच्या या धरणाच्या बांधकामाला १९९७ मध्ये सुरवात झाली असली तरी अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. २०१०-११ मध्ये धरणाची अंशत: घळभरणी केल्याने सद्य:स्थितीला ०.६० टीएमसी पाणीसाठवण क्षमता झाली आहे. अलीकडे पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत त्याचा समावेश झाल्याने मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पाटबंधारे विभागापुढे आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉररूमधील प्रकल्प म्हणून मराठवाडीवर सर्वांचेच लक्ष असले तरी पाटबंधारे विभागासह संबंधित ठेकेदारावर मात्र गेल्या दीड वर्षापासून वाळू-वाळू करण्याची वेळ आली आहे. 

जिल्हा प्रशासनाकडे वारंवार कागदोपत्री सोपस्कार आणि अर्ज, विनंत्या करूनही काही उपयोग न झाल्याने बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणस्थळावर वाळूच्या जागी स्टोनक्रश सॅण्डचे मोठे ढीग लागलेले दिसत आहेत. या प्रकल्पाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी सुमारे दहा हजार ब्रास वाळूची गरज होती. मात्र, त्यातील हजारभर ब्रासचीही मागणी पूर्ण न होवू शकल्याने मध्यंतरी धरणस्थळावर आणिबाणीचा प्रसंग निर्माण झाला होता. वाळूअभावी बंद राहिलेले बांधकाम आणि चढ्या भावाने केलेली वाळू खरेदी यामुळे ठेकेदाराचे जबर आर्थिक नुकसान झाल्याचीही चर्चा येथे आहे. सध्या सांडव्याचे आणि इंटकवेलचे बांधकाम, बोगद्याची दुरुस्ती, मातीकाम आदी विविध कामे धरणस्थळावर सुरू आहेत. दीडशेवर कर्मचारी आणि विविध यंत्रणा त्या कामात व्यस्त असून सिंमेट मिश्रण मिक्‍सिंगचे तीन प्लॅंट धरणस्थळावर उभारण्यात आले आहेत. धरणाच्या बोगद्यातील दुरुस्तीचे काम सोपे व्हावे यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून ते रिकामे केले आहे.

सांडव्याच्या बांधकामानंतर यावर्षीच्या पावसाळ्यात मराठवाडी धरणामध्ये पाणीसाठा वाढणार हे निश्‍चित आहे. जलाशयालगतच्या गावांमध्ये अजूनही अनेक धरणग्रस्त कुटुंबांचे वास्तव्य असल्याने पावसाळ्यापूर्वी त्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्याबरोबरच आवश्‍यक उपाययोजनांसाठी पाटबंधारे विभागाकडून सध्या हालचाली सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwadi Artificial Sand