मराठवाडी धरणाने गाठला तळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

ढेबेवाडी - मराठवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या हंगामातील चारपैकी तीन फेऱ्या पूर्ण झाल्याने आगामी दोन-अडीच महिने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबरच नदीकाठी नळयोजनेच्या विहिरी असलेल्या ग्रामपंचायतींनाही पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान धरणातील पाणीपातळी हळूहळू तळ गाठू लागल्याने तेथील सिंचन तथा विद्युत विमोचक अंतर्गत तातडीच्या दुरुस्तीची कामेही लवकरच हाती घेतली जाणार आहेत.

मराठवाडी धरणाचे १९९७ मध्ये सुरू झालेले बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही. २.७३ टीएमसी क्षमतेच्या धरणाची प्रथम टप्प्यातील अंशत: घळभरणी २०१०-११ मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये आजतागायत ०.६० टीएमसी पाणीसाठा होत आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील ४६ गावांमध्ये या धरणाचे लाभक्षेत्र असून एकूण पाणीसाठ्यातील एक टीएमसी पाणी टेंभू योजनेला देण्याचेही नियोजन आहे. पण, अपूर्ण बांधकामामुळे सध्या धरणात होत असलेल्या पाणीसाठ्यातून ६२०० हेक्‍टरपैकी १८२३ हेक्‍टर क्षेत्रावरच सिंचन होत आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांमध्ये वांग नदीवर दहापैकी आठ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून दोन अपूर्ण आहेत. पावसाळ्यात धरणात ०.६० टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर ऑक्‍टोबर- नोव्हेंबरपासून जूनपर्यंत पाणी सोडण्याची साधारणपणे चार ते पाच रोटेशन होतात. शेतकऱ्यांची मागणी व गरज लक्षात घेऊन त्याचे नियोजन केले जाते. नदीकाठी असलेल्या अनेक गावांच्या सार्वजनिक नळ योजनांही टंचाई काळात त्याचा फायदा होतो.

मराठवाडी धरणातील पाण्याच्या भरवशावर लाभक्षेत्रातील शेतकरी पीक नियोजन करत असल्याने बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता पाणी सोडण्याची तिसरी फेरी सुरू आहे. दोन दिवसांपासून १३३ क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. वांग नदी हंगामी असल्याने धरणात पाठीमागून होणारी पाण्याची आवक आता पूर्णपणे थांबली आहे. 

दुरुस्तीची कामे लवकरच
तिसऱ्या फेरीनंतर धरणात शिल्लक राहणारा दोनशे एमसीएफटी पाणीसाठा टंचाई काळासाठी पुरेसा असला तरी अजून साधारणपणे अडीच ते तीन महिने तो वापरायचा असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्‍यकता आहे. दरम्यान धरणाची पाणीपातळी हळूहळू तळ गाठू लागल्याने सिंचन तथा विद्युत विमोचक अंतर्गत तातडीच्या दुरुस्तीची कामेही लवकरच हाती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Marathwadi Dam Water level Decrease