'ऍट्रॉसिटी' कायदा अधिक कडक करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

कोल्हापूर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची (ऍट्रॉसिटी) अधिक कडक अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध, भटके-विमुक्त, मुस्लिम यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान सन्मान मूक महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात चार ते पाच लाख लोक सहभागी झाल्याचा दावा संयोजकांच्या वतीने करण्यात आला.

दुपारी दोनच्या सुमारास ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरवात झाली. तत्पूर्वी सकाळी दहा वाजल्यापासून समाजबांधवांनी दसरा चौक फुलून गेला होता. सुरवातीला तरुणी, महिला, नंतर तरुण कार्यकर्ते व शेवटी राजकीय व्यक्ती, असे या मोर्चाचे स्वरूप राहिले. व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे मोर्चा अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मूक मोर्चा असल्याने कोणत्याही घोषणा नव्हत्या; पण आपल्या मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांनी हातात घेऊन या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. मोर्चात संविधान रथही सहभागी करण्यात आला होता.

छत्रपती शाहूंच्या सामाजिक समतेच्या भूमीत निघालेला हा मोर्चा कोणत्याही जातीसमूहाविरोधात नसून, समाजातील शोषित जनतेला भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्‍नांच्या न्याय्य मागण्यांसाठी असल्याचे संयोजकांनी या वेळी सांगितले. मोर्चाच्या वतीने समाजातील दहा मुलींनी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. राष्ट्रगीत होऊन मोर्चाची सांगता झाली.
या मोर्चात कोल्हापूरसह सीमाभागातील, कोकण, मुंबई, पुणे येथील विविध समाजांचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चेकऱ्यांना शिवसेनेतर्फे जेवण
संविधान मोर्चात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. ग्रामीण भागातील महिला लहान मुलांसह आल्या होत्या. त्यांच्यासाठी दसरा चौकात शिवसेनेतर्फे जेवणाची सोय केली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यासाठी नियोजन केले. मोर्चेकऱ्यांना जेवण दिलेच; शिवाय या ठिकाणी स्वच्छताही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करून हा भाग चकाचक केला.

Web Title: march for atrocity