बाजार समिती निवडणूक: जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास अर्ज ठरणार बाद

vote
vote

सोलापूर - सोलापूर बाजार समितीच्या 18 मतदारसंघासाठी 201 उमेदवारांनी 265 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. 2 जूनपर्यंत उमदेवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. आता उमेदवारांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. मात्र, राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवाराने अर्जासमवेत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारकच आहे. अन्यथा त्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात येणार आहे. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे सुपूत्र नगरसेवक डॉ. किरण देशमुख तसेच माजी आमदार दिलीप माने यांच्यासह त्यांचे सुपूत्र पृथ्वीराज माने यांनी आणि माजी आमदार रतीकांत पाटील यांच्यासह अन्य मात्तब्बर मंडळींनी बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत आली असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुध्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख अशी लढत होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

बाजार समितीचे तत्कालीन सभापती व संचालक (काँग्रेसचे नेते) यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांनी घरातील दुसऱ्या उमेदवाराचा पर्याय शोधला आहे. सध्या बाजार समितीच्या निवडणुकीची सर्व सूत्रे पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानुसार सुरु असल्याचीही चर्चा आहे. सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे आदी नेतेमंडळी पालकमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, आता जातवैधता प्रमाणपत्र असलेल्या सक्षम उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. 

''राखीव मतदारसंघासाठी अर्ज सादर करताना उमेदवाराने अर्जात अनुसूचित जाती-जमाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती अथवा इतर मागासवर्ग यापैकी कोणत्या वर्गात मोडत आहे याची माहिती नमूद करणे आवश्‍यक आहे. उमेदवारी अर्जासमवेत स्वत: प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला जाईल''. 
यशवंत गिरी, सचिव, सहकार निवडणूक प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com