'बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी काय केले'

राजकुमार शहा 
बुधवार, 18 जुलै 2018

पंचायत समिती सभागृहातुन आलेल्या बाजार समिती सदस्याची मुदत संपली असुन अद्याप नव्या सदस्याची नियुक्ती का केली नाही असे अनेक प्रश्न काळे यांनी उपस्थित केल्याने अध्यक्ष व सचिवांना उतरे देणे अडचणीचे झाले. त्यामुळे त्यांनी सभागृह सोडुन जाणे पसंद केले.

मोहोळ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजपर्यंत झालेल्या सर्व ठरावाच्या नकला द्या बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी काय केले. या सह अन्य प्रश्नांचा भडीमार बाजार समितीचे स्विकृत सदस्य सतीश काळे यांनी करताच उत्तरे द्यावयाची अथवा चर्चा करण्याऐवजी बाजार समितीचे अध्यक्ष नागेश साठे व सचिव सचिन पाटील हे सभागृह सोडुन गेल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्विकृत सदस्य सतिश काळे यांनी केला. दरम्यान ही सभा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे स्वीकृत सदस्य सतीश काळे यांनी केली आहे.

मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठक सोमवारी आयोजीत केली होती. सध्या बाजार समितीवर माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व आहे, तर पणन महासंघाकडुन भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिश काळे यांची स्विकृत सदस्य म्हणून सहकार व पणन मंत्री सुभाष दशमुख यांनी नियुक्ती केली आहे.

आजपर्यंत बाजार समितीच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी अनेक ठराव झाले. त्या सर्व ठरावाच्या नकला द्या जनावरांच्या बाजाराचा प्रश्न अद्यापही प्रलंबीत आहे. जुन्या व नवीन व्यापाऱ्यांचे करार केले नाहीत, नवीन व्यापाऱ्यांना व्यापारासाठी सुविधा देऊन त्यांना संधी द्या नवीन व्यापारी गाळे बांधण्याबाबत अद्यापही चर्चा झाली नाही असे प्रश्न काळे यांनी उपस्थित करून भविष्यात या संस्थेची निवडणुक अटळ आहे. त्यामुळे निवडणुकीच्या खर्चापुरते तरी उत्पन्न वाढवा  असा सल्लाही काळे यांनी दिला.

पंचायत समिती सभागृहातुन आलेल्या बाजार समिती सदस्याची मुदत संपली असुन अद्याप नव्या सदस्याची नियुक्ती का केली नाही असे अनेक प्रश्न काळे यांनी उपस्थित केल्याने अध्यक्ष व सचिवांना उतरे देणे अडचणीचे झाले. त्यामुळे त्यांनी सभागृह सोडुन जाणे पसंद केले.

स्विकृत सदस्य काळे यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत. त्या योग्य असून त्यांच्या मागणीनुसार त्यांना आवश्यक कागदपत्रके देणे बाजार समितीला  बंधनकारक आहे.
- एम एस निगेवान ( सहाय्यक निबंधक प्रतिनीधी मोहोळ )

बाजार समितीचा सर्व कारभार पारदर्शक आहे दररोज माहिती ऑनलाईन भरली जाते काळे यांनी बाजार समितीच्या हितासाठी प्रयत्न करावा आंम्ही सहकार्य करू.
- नागेश साठे ( अध्यक्ष बाजार समिती मोहोळ )

Web Title: market committee in mohol