बाजार समितीतील सौदे ऑनलाइन

शिवाजी यादव
शनिवार, 25 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौदे ऑनलाइन होणार आहेत. यातून व्यापारी, शेतकरी यांचा प्रवासखर्च, वेळ व श्रम अशी तिहेरी बचत होणार आहे. जवळपास ३० लाखांच्या अनुदानातून बाजार समितीत त्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ऑनलाइन सौदे सुविधा कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. 

कोल्हापूर - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौदे ऑनलाइन होणार आहेत. यातून व्यापारी, शेतकरी यांचा प्रवासखर्च, वेळ व श्रम अशी तिहेरी बचत होणार आहे. जवळपास ३० लाखांच्या अनुदानातून बाजार समितीत त्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ऑनलाइन सौदे सुविधा कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. 

शाहू मार्केट यार्डात गूळ, भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, धान्य बाजारात सौदे होतात. त्यासाठी विविध जिल्ह्यांतून, तसेच राज्यातून शेतीमाल येतो. शेतीमाल अडत्यांकडे सौद्यासाठी मांडला जातो. येथे पहाटे ६ ते सकाळी ११ या वेळेत सौदे होतात. त्यासाठी खरेदीदार, व्यापारी सौदे स्थळावर येतात. शेतीमाल व भाव बघून सौद्यात खरेदी करतात. सर्व व्यवहारांची नोंद बाजार समितीच्या पातळीवर घेतली जाते. अशी सर्व प्रक्रिया सध्या मानवी यंत्रणेद्वारे केली जात आहे. यापुढील काळात सौदे टप्प्याटप्प्याने ऑनलाइन होणार आहेत. 

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निधीतून कृषी पणन विभागाच्या पुढाकाराने ऑनलाइन सुविधा करण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार राज्यभरातील ३० बाजार समित्यांची यासाठी निवड केली आहे. त्यासाठी ३० लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात केबल टाकणे, आवश्‍यक तेथे संगणक जोडणे व प्रत्यक्ष सौदे स्थळावर आलेल्या शेतीमालाचे चित्रीकरण करून ते संकेतस्थळावर टाकण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्या शेतीमालाची प्रतवारीनुसार छायाचित्रे संकेतस्थळावर टाकली जाणार आहेत. ती छायाचित्रे पाहून खरेदीदार जेथे आहे, तेथून मालाची खरेदी नोंदवू शकणार आहे. 

यासाठी अडत्याकडील शेतीमालाची एकूण आवक, एकूण उलाढालीची क्षमता, मालाच्या वर्गीकरणानुसार भाव, याची पूर्व माहिती ऑनलाइनच दिली जाणार आहे. त्या आधारे खरेदीदारालाही माल खरेदी करण्यासाठी सुरक्षितता जाणून घेता येणार आहे. असे सर्वसाधारण स्वरूप या ऑनलाइन सौदे सुविधेचे असणार आहे. 

शाहू मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा या बाजारातील सौदे पहिल्या टप्प्यात ऑनलाइन होतील. त्यानंतर उर्वरित शेतीमालाचे सौदे ऑनलाइन होणार आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.  

दर्जा ठरवताना लागणार कस
बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालापैकी १० ते २५ टक्के शेतीमाल स्थानिक बाजारपेठेत जातो. उर्वरित शेतीमाल कोकण, गोवा, मराठवाडा, बेळगाव, कर्नाटककडे पाठविला जातो. त्यामुळे त्या त्या प्रांतातील खरेदीदारांना या ऑनलाइन सुविधेचा चांगला लाभ होऊ शकतो. त्यामुळे येथे येणाऱ्या मालाचा उठावही चांगला होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, ऑनलाइन सुविधेत बहुतांश शेतीमालाचे व्हिडीओ चित्रीकरण किंवा स्थिर छायाचित्रण ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यातून शेतीमाल दिसायला कसा आहे, हे समजू शकते; पण त्याचा चवीवरून दर्जा समजून घेता येणे मुश्‍कील आहे. यावर कोणता पर्याय काढला जातो, याबाबतची उत्सुकता व्यापारी वर्गात आहे.

Web Title: market committee online deals