बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना सक्षम करावे - सुभाष देशमुख

बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना सक्षम करावे - सुभाष देशमुख

सांगली - कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकरी केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी, शेतकरी हितासाठी विश्वस्त म्हणून काम करावे. मिरची, हळद, गूळ आणि बेदाण्याची सांगलीत मोठ्या प्रमाणात आवक होते. त्यांच्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारले तर समितीची गणना अग्रगण्य बाजार समितीत होईल, असे प्रतिपादन पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे केले. 

सांगली बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना 5 रुपयांमध्ये जेवण व वॉटर ए. टी. एम. सुविधांचे उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार पतंगराव कदम होते. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, अजितराव घोरपडे, दिनकरतात्या पाटील, शरद पाटील, सभापती प्रशांत शेजाळ, उपसभापती रामगोंडा संती उपस्थित होते. 

शेतकरी बांधवासाठी अन्न-पाणी सुविधा उपलब्धतेचे मंत्री देशमुख यांनी कौतुक केले. ते म्हणाले,""समितीने अन्न व पाणी सुविधांवरच न थांबता, भविष्यात शेतकरी निवास उभारावे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवायची असेल, बेदाण्याला चांगला दर मिळवून द्यायचा असेल तर पणन मंडळाची शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबवा. समितीने शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारावीत. गरज पडल्यास बाजार समितीचा विस्तार करावा. आवश्‍यक ती सर्व मदत करू, शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलाईदारांना न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक, विश्वासघात करू नये. गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका. गंभीर दोष असतील तर कडक कारवाई करा. प्रयोगशील शेतकऱ्यांनी हळद, गूळ, बेदाणा आणि मिरचीवर प्रयोग करावेत. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र प्रमाणे मेक इन सांगलीचे स्वप्न पाहावे. या चारही शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभे करावेत.'' आमदार कदम, अजितराव घोरपडे यांनी मनोगते व्यक्त केली. कामगार नेते बापूसाहेब मगदूम, बाळासाहेब बंडगर यांचा सत्कार केला. जपानमध्ये शिक्षणासाठी निवड झालेल्या शुभम गोरेंचा गौरव करण्यात आला. सभापती प्रशांत शेजाळ यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती रामगोंडा संती यांनी आभार मानले. 

पाच रुपयांमध्ये जेवण 
बाजार समितीतर्फे वसंतदादा मार्केट यार्डात येणाऱ्या शेतकऱ्यास 5 रुपयांमध्ये 3 चपाती, 1 सुकी भाजी, पातळ भाजी, पुरेसा भात, लोणचे असे जेवण देण्याची सोय केली आहे. प्रथमत: 100 आणि प्रतिसाद पाहून आवश्‍यकतेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. कमाल मर्यादा 400 शेतकरी असेल. समितीवर प्रतिवर्षास 20 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com