नोटाबंदी; नाही ‘तोंडबंदी’

नोटाबंदी; नाही ‘तोंडबंदी’

मानिनी जत्रेत ५८ लाखांची विक्री; ग्रामीण उत्पादनांना सातारकरांची पसंती

सातारा - नोटाबंदीच्या निर्णयाने देशभरातील बाजारपेठ मंदावली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांपासून ते मोठमोठे व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. मात्र, त्याच्या नेमके उलटे चित्र जिल्हा परिषदेने येथे आयोजित केलेल्या मानिनी जत्रेत पाहाण्यास मिळाले. पाच दिवसांत तब्बल ५८ लाख रुपयांची विक्री येथे झाली. त्यामध्ये सर्वाधिक विक्री खाद्यपदार्थांची झाल्याने नोटाबंदी असली तरी ‘तोंडबंदी’ नव्हे, असेच चित्र दिसून आले. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्हा परिषदेच्या येथील मैदानावर मानिनी जत्रेचे आयोजन केले होते. त्यात १३६ स्वयंसहायता गट सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील या गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही जत्रा भरविली जाते. ग्राहकांना चलनाचा तुटवडा भासू नये म्हणून स्टेट बॅंक ऑफ इंडियाने स्वॅप मशिन उपलब्ध केले होते. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जाम, जेली, जावळीतील हातसडीचा तांदूळ, नाचणी उत्पादने, वाई तालुक्‍यातील हळद, पाटण तालुक्‍यातील नैसर्गिक मध, कऱ्हाड तालुक्‍यातील काकवी, सेंद्रिय गूळ तसेच खटावमधील जान, घोंगडी, माणमधील भस्म, दवना, सोलापुरी चादरी, घोंगडी, जान तसेच सोलापूरमधील सोलापुरी चादरी, येवला पैठणी, रोस्टेड गव्हाचा चिवडा, पुसेगावची मातीची भांडी, लोणची, फलटण तालुक्‍यातील विविध प्रकारच्या चटण्या त्याचबरोबर माथेरानची चप्पल, विविध प्रकारची कडधान्ये, आवळा उत्पादन, इमिटेशन ज्वेलरी, आयुर्वेदिक औषधे, शतावरी कल्प व इतर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. यासोबतच खवय्यांसाठी अनेक शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध होते.

तांदूळ, मांसाहाराची बाजी
डांगरेघर येथील संत ज्ञानेश्वर गटाच्या हातसडीच्या तांदळाची एक लाख २० हजाराची विक्री, तर इंदापूरच्या सावित्रीबाई गटाने मांसाहारी जेवणाची ९६ हजार इतकी उच्चांकी विक्री केली. या जत्रेत २०१५ मध्ये ३२ लाख, २०१४ मध्ये २८ लाखांची विक्री झाली होती. यावर्षी उच्चांकी विक्री झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com