कोरोनाची धास्ती : मार्केट यार्डातील सौदे चार दिवस बंद...धान्यबाजारही तीन दिवस बंद राहणार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सांगली-  जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, चेंबर ऑफ कॉमर्स आणि खरेदीदार अडते यांनी संयुक्त बैठक घेऊन चार दिवस सौदे आणि तीन दिवस धान्य विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ते 11 जुलैअखेर गूळ, हळद व बेदाणा सौदे बंद राहतील. तर 9 ते 11 जुलैअखेर धान्य विभाग बंद राहणार आहे. बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली. 

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर बेदाणा सौदे बंद करण्यावरून व्यापारी वर्गात दोन गटात वाद निर्माण झाला होता. तेव्हा विश्रामबाग पोलिसांनी सौदे न घेण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानंतर जवळपास अडीच महिने सौदे बंद राहिले. त्यामुळे कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली होती. या काळात धान्य विभाग देखील ठराविक वेळेत सुरू ठेवण्यात आला. लॉकडाउनमध्ये शिथीलता आणल्यानंतर बेदाणा आणि हळद सौदे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू तो यशस्वी झाला नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गेल्या काही दिवसापासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हळद व बेदाणा सौदे खुल्या पद्धतीने होऊ लागलेत. तसेच धान्य विभाग देखील सुरू आहे. 

मार्केट यार्डात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून तसेच इतर जिल्ह्यातील शेतकरी, खरेदीदार शेतीमाल विक्री आणि खरेदीसाठी येतात. तसेच सध्या कोरोनाचे रूग्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात वाढू लागलेत. पाचशेहून अधिक रूग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे सर्वांना धास्ती वाटू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केट यार्डातील सौदे बंद ठेवण्याबाबत बाजार समिती, चेंबर ऑफ कॉमर्स, अडते, खरेदीदार आदींची संयुक्त बैठक सोमवारी झाली. त्यामध्ये बाजार समिती आवारात येणाऱ्या सर्व घटकांच्या सुरक्षेसाठी मुख्य आवारातील गूळ, हळद आणि बेदाणा सौदे 8 ते 11 जुलैअखेर चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच धान्य विभाग देखील 9 ते 11 जुलैअखेर बंद ठेवण्यात येणार आहेत. 
दरम्यान सौदे आणि धान्य विभाग बंद असले तरी या काळात बाजार समितीचे कार्यालयीन कामकाज सुरू राहणार असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market yard deals closed for four days from today.Grain market will also be closed for three days