केवळ अडीच हजारात त्यांनी बांधल्या रेशीमगाठी

केवळ अडीच हजारात त्यांनी बांधल्या रेशीमगाठी

कोल्हापूर -  नवरा भूमापन अधिकारी, नवरी डीवायएसपी याशिवाय दोन्हीकडची घराणीही तोलामोलाची. त्यामुळे लग्न कसं दणक्‍यात व्हायला पाहिजे होतं. जेवणाच्या पंगतीवर पंगती उठायला पाहिजे होत्या. मांडव रोषणाईने लखलखून जायला हवा होता. व्हीआयपी पाहुण्यांची तर रांगच लागायला हवी होती. एकूण खर्चाचा हिशेब लाखाच्या पटीत झाला असता, तरी तो एवढा होणारच म्हणून मान्यही झाला असता. पण, पटणार नाही केवळ आणि केवळ अडीच हजार रुपयांत हे लग्न झाले आहे. लग्नाच्या सर्व अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांनी एक आदर्श घालून दिला आहे. 

राधानगरीचे भुमी अभिलेख उपअधिक्षक डॉ. सौरभ तुपकर व शाहुवाडीच्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांच्या लग्नाची ही आदर्शकथा आहे. गेल्या महिन्यात त्यांचे लग्न झाले आहे. कर्ज काढून किंवा पै पाहूणे शेजार पाजारी काय म्हणतील म्हणून ऐपत नसताना थाटामाटात लग्न समारंभ करणे व पुढे कर्जाचे हप्ते फेडत बसणे, या पेक्षा साधेपणाने लग्न केले, तरी ते मोठी उंची गाठणारे ठरू शकते. हे या दोन अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. गेले तीन दिवस त्यांच्या लग्नाची ही कथा सोशल मिडीयावरही फिरत आहे. 

डॉ. तुपकर एमबीबीएस आहेत. पण ते प्रशासकीय सेवेत भुमीअभिलेख अधिकारी म्हणून आले. भूमी अभिलेख म्हणजे सर्वांना समजणाऱ्या भाषेत सिटी सर्व्हे ऑफीस. आणि सीटी सर्व्हे म्हणजे ‘मालामाल‘ असेच वातावरण. पण तुपकर त्याला अपवाद. आणि डॉ. सोळंके याही एमबीबीएस. पण त्या पोलिस सेवेत आल्या. पोलिस सेवा म्हणजेही ठरवलं तर कमाईच कमाई. पण सोळंकेही त्याला अपवाद. या दोघांच लग्न ठरलं. आणि दोघेही वेगळ्या विचारांचे. त्यांनी ठरवल आपल लग्न कमीत कमी खर्चात करायचं. त्यांनी आपापल्या घरीही तसं सांगितलं. वास्तविक साहेब झालेल्या पोरापोरीचं लग्न म्हणजे घरातल्यांचा उत्साह भरून आलेला. पण या दोघांचा विचार ऐकून घरच्यांनी उत्साह गुंडाळून ठेवला. दोघे लग्नासाठी कोल्हापूरातील विवाह नोंदणी कार्यालयात आले. त्यासाठी फक्त अर्ध्या दिवसांची रजा काढली. 

सफारी नाही. जोधपुरी नाही. डॉ. तुपकर नेहमीप्रमाणे इनशर्टमध्ये. रोहिणीही नऊवारी नाही, घागरा नाही. सहावारी शालु नेसून आल्या. लग्नाला तुपकरांचे सात मित्र आणि डॉ. रोहिणींच्या पाच मैत्रिणी. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. मुद्रांक जिल्हाधिकारी शिवश्री जाधव यांनी विवाह प्रमाणपत्र दिले. मग हे नवरा बायको व त्यांच्या १२ मित्रमैत्रिणी जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. त्याचे बिल १८०० रूपये झाले. त्याआधी पेढे हार, बुके यासाठी ७०० रूपये खर्च झाले. आणि २ हजार ५०० रूपयांत या दोघांचे शुभमंगल सावधान उरकले.

लग्नावर होणारा अनावश्‍यक खर्च व त्याचा कुटुंबीयांवर पडणारा ताण हे मी अनेक ठिकाणी पाहिले होते. लोक समजूनही न समजल्यासारखे करीत होते. आम्ही मात्र आपल्यापासूनच वेगळी सुरवात व्हावी म्हणून लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. 
-डॉ. सौरभ तुपकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com