मुली मिळत नाहीत, तणावाखाली आहेत लग्नाळू! 

marriage issues due to high expectations of girls from boys
marriage issues due to high expectations of girls from boys

सोलापूर : तीन-चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा, अपेक्षित वेतनाचा अभाव, वर्षभर उत्सवांचा बाजार... आदी कारणांमुळे लग्न करून सोलापुरात येण्यास परगावच्या मुली तयार नसल्याचे चित्र आहे. या उलट इतर शहरांच्या मानाने सोलापुरात स्वस्ताई आहे, राहायला स्वत:चं घर, शिवाय कमी धावपळ आणि आपुलकीनं वागणारी माणसं इथं आहेत. त्यामुळे मुलींनी सोलापूरच्या तरुणांकडे सकारात्मकपणे पहावे, असे विवाह इच्छुकांचे म्हणणे आहे. 

स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात काही प्रमाणात सकारात्मक बदल होत आहेत. काही ठिकाणी रस्ते होताहेत तर काही भागात उंच इमारती उभारल्या जात आहेत. विविध मॉलसह ब्रॅण्डेड कंपन्यांचे शोरूमही तरुणांची गर्दी खेचत आहेत. असे असले तरी सोलापुरातील तरुणांसोबत लग्न करण्यासाठी स्थानिक आणि परगावच्या मुली उत्सुक नसल्याचे आढळते. मुलींसोबतच त्यांचे पालकही सोलापूरविषयी नकारात्मक असल्याचे विवाह इच्छुक तरुण आणि वधू-वर परिचय केंद्र चालकांचे म्हणणे आहे. 

लग्न करून सोलापुरात नांदायला येण्यास मुली का तयार नाहीत याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेकांशी संवाद साधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. शहरात रस्ते, मोठ्या इमारती, मॉलमुळे झगमगाट वाढला असला तरी तरुणांना अपेक्षित रोजगार सोलापुरात नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अनेक इंजिनिअर तरुण कमी पगारात काम करीत आहेत. शिक्षण घेऊनही स्थानिक पातळीवर काम नसल्याने पुण्या-मुंबईकडे अनेकांचा ओढा आहे. 

नकारात्मक मुद्दे 
- मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षा 
- स्पर्धा परीक्षांचे पुण्यात राहून लागलेले स्वप्नवत व्यसन. 
- सोलापूरमध्ये नोकरी आणि व्यवसायाची वाढीची कमतरता. 
- दुष्काळी परिस्थिती आणि अनियमित पाणीपुरवठा. 
- सोलापूरविषयीचा नकारात्मक प्रचार. 

सकारात्मक मुद्दे 
- स्मार्ट सिटी योजनेमुळे सकारात्मक बदल. 
- इतर शहरांच्या मानाने सोलापुरात स्वस्ताई. 
- दहा मिनिटांत शहरात कोठेही जाता येते. 
- दळणवळणासाठी पुरेशा सुविधा. 
- सांस्कृतिक विविधता, कार्यक्रमांची रेलचेल. 

स्वतःचे घर, फ्लॅट आणि बऱ्यापैकी पगाराची नोकरी असलेले अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक मुलींना आणि त्यांच्या पालकांना पुणे-मुंबईतला जावई हवा आहे. त्यांच्या या हट्टामुळे माझ्यासारख्या हजारो तरुणांचे लग्नाचे वय वाढत आहे. जीवनात लवचिकता आणि सामंजस्य राखल्यास आयुष्य खरे सुखी होऊ शकते. 
- विजय जाधव, विवाह इच्छुक तरुण 

सोलापूर शहर स्मार्ट होत असले तरी इथल्या लोकांची मानसिक अद्याप स्मार्ट होताना दिसत नाही. इथल्या तरुणांत कष्ट करण्याची तयारी दिसून येत नाही. रोजगाराचाही प्रश्‍न आहेच. तरुणींना कष्ट करण्याची तयारी असलेला पती हवा आहे. अनेक तरुण जयंती-उत्सव, मिरवणुकांत रमले आहेत. अशा वातावरणामुळे माझ्यासारख्या मुली सोलापूरचा नवरा नको म्हणत आहेत. 
- सुनीता माने, विवाह इच्छुक तरुणी 

पूर्वी गॅंगवारमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यातील लोक सोलापुरात मुली देत नव्हते. चार दिवसांआड येणाऱ्या पाण्यामुळे मराठवाड्यातील लोकही आपल्या मुली इथे नांदवायला पाठविण्यास तयार नाहीत. अधिक शिक्षण घेऊनही सोलापुरात चांगला पगार मिळत नाही. सोलापुरात मुली देण्यास पालक विचार करत आहेत. आम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून मुलींसह पालकांना समजावून सांगत आहोत. 
- भागवत इंगळे-देशमुख, चालक, वधूवर सूचक केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com