विवाह नोंदणी नोटीस आता ऑनलाइन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

सातारा - विवाहेच्छुक वधू-वरांना येत्या एक ऑगस्टपासून विवाहासाठीची नोटीस ऑनलाइनच देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विशेष विवाहेच्छुक वधू-वरांना घरबसल्या विवाह नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यांना फक्त विवाहाच्या वेळीच विवाह नोंदणी कार्यालयात जावे लागणार आहे. 

सातारा - विवाहेच्छुक वधू-वरांना येत्या एक ऑगस्टपासून विवाहासाठीची नोटीस ऑनलाइनच देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विशेष विवाहेच्छुक वधू-वरांना घरबसल्या विवाह नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यांना फक्त विवाहाच्या वेळीच विवाह नोंदणी कार्यालयात जावे लागणार आहे. 

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका दुय्यम निबंधकाला त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी म्हणून घोषित केले आहे. विवाह नोंदणी विभागाने दस्त नोंदणीप्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचेदेखील संगणकीकरण केले आहे. विवाह अधिकारी कार्यालयात गेल्यानंतर डाटा एन्ट्री करण्यामध्ये इच्छुक वधू-वरांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच त्यामध्ये चुका होऊ नयेत यासाठी विवाह नोंदणी विभागाने igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाटा एंट्री करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. 

विवाहेच्छुक वधू-वरांना विवाह करण्यापूर्वी संबंधित जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्याकडे आपल्या विवाहाची नोटीस, वय व वास्तव्याचे पुरावे व इतर कागदपत्रे सादर करून नोटीसची फी भरावी लागते. त्यानंतर विवाह अधिकाऱ्याकडून विवाहेच्छुक वधू-वराची नोटीस स्वीकारली जाऊन त्यांची नोटीस सदर कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावली जाते. वर किंवा वधू या दोघांपैकी एक जण अन्य जिल्ह्यातील असल्यास या नोटिशीची एक प्रत त्या जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्याकडे नोटीस बोर्डवर लावण्यासाठी पाठविली जाते. विवाह अधिकाऱ्याकडे नोटीस दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत नियोजित वधू-वरांच्या विवाहाबद्दल कुणाचा आक्षेप न आल्यास, त्यानंतरच्या 60 दिवसांत विवाह अधिकारी तीन साक्षीदारांसमक्ष विवाह संपन्न करून त्यांना प्रमाणपत्र दिले जाते, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागातून दिली. 

यापूर्वी विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाहेच्छुक वधू-वरांना आपल्या विवाहाची नोटीस देण्यासाठी व 30 दिवसांनंतर विवाहासाठी विवाह नोंदणी कार्यालयात जावे लागत होते. मात्र, विवाह नोंदणी विभागाने एक नोव्हेंबर 2017 पासून विवाहासाठीची नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. 

पैसे, वेळेची बचत  
ही प्रक्रिया लागू झाल्यानंतर विवाहेच्छुकांना नोटिसीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात जावे लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या पैशात आणि वेळेतही बचत होण्यास मदत होईल. नियोजित वर किंवा वधूला विवाह नोंदणी कार्यालयात न जाता, त्यांना कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन नोटीस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठीची लिंक igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Web Title: Marriage registration notice now online

टॅग्स