परंपरेचे बंध तोडून विधवा तरुणीचे दिराशी लग्न

परंपरेचे बंध तोडून विधवा तरुणीचे दिराशी लग्न

सांगली - लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते मात्र, ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्‍नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील कुटुंबीयांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून सुदृढ परंपरेची मुहूर्तमेढ रोवली.

सांगलीतील शांताराम नामदेव पाटील यांचा मोठा मुलगा संतोष याचे लग्न इचलकरंजी येथील दत्तात्रय निवृत्ती पाटील यांची कन्या सोनाली हिच्याशी झाले. लग्न झाल्यानंतर दोन वर्षांतच म्हणजे ५ ऑगस्ट २०१८ रोजी संतोषचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी तिची मुलगी सहा महिन्यांची होती. पदरी छोटीशी कन्या आणि मोठ्या आयुष्याच्या अनिश्‍चित भविष्याची चिंता घेऊन सोनालीची वाटचाल सुरू झाली. मुलाच्या मृत्यूबरोबरच सुनेच्या भविष्याची आणि तिच्या दुःखाची चिंता तिची सासू राजश्री यांना वाटू लागली. राजश्री या पूर्वीपासूनच पुरोगामी विचाराच्या असल्याने त्यांनी सुनेचे वैधव्य दूर करण्याचा निर्णय घेतला. 

तिचा आयुष्यभर सांभाळ करायचा निर्णय घेतला तरी धाकटी सून म्हणून घरात येणारी स्त्री मोठ्या सुनेच्या मुलाला तितके प्रेम देईलच असे नाही. याशिवाय पुन्हा भविष्यातील या दोन्ही महिलांचे नातेंसंबंध कसे राहतील याचीही चिंता त्यांना होती. या पार्श्‍वभूमीवर सासू राजश्री यांनी सोनालीचा विवाह तिच्या धाकट्या दिराशी म्हणजे उमेशशी करण्याचा निर्णय घेतला. सासरे शांताराम यांना ही गोष्ट पटवून दिली. त्यांच्या संमतीनंतर सोनालीच्या आई-वडिलांना बोलावून त्यांनाही हा निर्णय सांगितला.

परंपरेचे बंध तोडताना राजश्री यांनी समाजाचा विचार करण्यापेक्षा एका स्त्रीच्या आयुष्याचा विचार महत्त्वाचा असल्याचे सर्वांना सांगितले. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीस 
होकार दिला. सोनालीचा २४ फेब्रुवारी २०१९ रोजी तिच्या दिराशी म्हणजे उमेश पाटील यांच्याशी विवाह झाला. सोनाली सतोष पाटील आता सोनाली उमेश पाटील अशी तिची नवी ओळख तयार झाली. त्यांच्या या नात्याला माणुसकीची किनार असल्याने समाजातील अनेक लोकांनी या निर्णयाचे 
कौतुक केले.

मराठा समाज संस्थेकडून प्रेरणा
सांगलीतील मराठा समाज संस्थेकडून विधवा विवाहासाठी गेली अनेक वर्षे उपक्रम राबवला जातोय. त्यांनी यासाठी प्रेरणा देऊन मराठा समाजाचे अध्यक्ष ॲड. उत्तमराव निकम, माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, ए. डी. पाटील यांनी दोन्ही कुटुंबात जागृती केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com