#MartahKrantiMorcha मंत्र्यांना फिरू देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

कोल्हापूर - पैसे देऊन आंदोलक पाठविणाऱ्या पक्षात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. त्यांना मराठा समाजाशी काहीही देणेघेणे नाही. अशा स्थितीत पालकमंत्री काही निर्णय घेत नाहीत. आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने सल्ले देत आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण तत्काळ मिळाले नाही तर भाजप मंत्र्यांच्या गाड्या कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशाराही दसरा चौकात सुरू असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलनावेळी विविध पक्ष, संघटना तसेच नागरिकांनी दिला. तसेच या ठिय्या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकांनी पाठिंबा जाहीर केला.

माजी आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘‘पूर्वीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र सध्याच्या सरकारला ते टिकविता आले नाही. या सरकारची ती मानसिकताही नाही. काँग्रेस मराठा समाजाच्या पाठीशी राहील. विरोधी पक्षात असताना चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी विधान परिषदेच्या सभागृहाबाहेर घोषणा देत होते. आज ते सत्तेत असताना मराठा समाजाच्या आंदोलनात पेड लोक असल्याचे सांगत आहेत. या आंदोलनात भाडोत्री लोक नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे.’’

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांना आंदोलनात भाडोत्री आंदोलक घुसल्याचा भास होतोय.

 खरं म्हणजे पाटील यांच्याच पक्षात पैसे देऊन आंदोलक पाठविण्याची प्रथा आहे. त्यामुळे ते आंदोलनाला बदनाम करत आहेत.’’

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर काल कोल्हापुरातही आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले होते. दसरा चौकात शाहीर आझाद नायकवडी यांनी मराठा आरक्षणाबाबतचा पोवाडा सादर केला. ‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ अशा शब्दात मराठा समाजाचा निर्धार व्यक्त केला. त्यांना शाहीर पापालाल नायकवडी, युवराज पुजारी, शिवाजी लांडगे, स्वराज नायकवडी, भार्गव कांबळे, बापूसाहेब साळोखे यांनी साथ दिली. 

युवा सेना, शिवसेनेचे ऋतुराज क्षीरसागर, पद्‌माकर कापसे, दीपक गौड, तुकाराम साळोखे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून सोडला. 

घरातच पूजेत धन्यता
मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली पाहिजे होती. मात्र तसे न करता घरातच पूजा करून धन्यता मानली आहे. हेच या सरकारचे धोरण चुकत आहे, असेही मत पी. एन. पाटील यांनी व्यक्त केले.

विविध संघटनांनी दिला पाठिंबा
ठिय्या आंदोलनामध्ये माजी आमदार पी. एन. पाटील, निवृत्त पोलिस अधिकारी कल्याणकारी संघटनेचे मदन चव्हाण, प्रभाकर पाटील, पी. जी. मांडरे, बी. बी. पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. त्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील असे सांगितले. जहिदा मुजावर, अनिल घाटगे यांच्यासह नगरसेवक आदी उपस्थित होते.

Web Title: #MartahKrantiMorcha maratha reservation Agitation Minister