हुतात्मा जवान घाडगेंना अखेरचा सलाम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

फत्त्यापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; हजारोंची उपस्थिती
अंगापूर - जम्मू काश्‍मीर येथील पूंछ सेक्‍टरमधील चौकीवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना हुतात्मा झालेले फत्त्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांच्यावर आज सायंकाळी हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील जगन्नाथ घाडगे व दीपक यांचा चार वर्षांचा मुलगा शंभू यांनी भडाग्नी दिला.

फत्त्यापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; हजारोंची उपस्थिती
अंगापूर - जम्मू काश्‍मीर येथील पूंछ सेक्‍टरमधील चौकीवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना हुतात्मा झालेले फत्त्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांच्यावर आज सायंकाळी हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील जगन्नाथ घाडगे व दीपक यांचा चार वर्षांचा मुलगा शंभू यांनी भडाग्नी दिला.

हुतात्मा दीपक घाडगे यांचे पार्थिव दुपारी चारच्या सुमारास फत्त्यापूर (ता. सातारा) येथे आणण्यात आले. ते पोचताच अमर रहे, अमर रहे दीपक घाडगे अमर रहे'च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. या वेळी उपस्थितांतून पाकिस्तान विरोधी संताप व्यक्त होत होता. काही क्षणात त्यांचे पार्थिव त्यांचे घरी पोचले. त्या वेळी दीपक यांच्या वृद्ध आई शोभा, वडील जगन्नाथ, पत्नी निशा, बहीण माया यांनी एकच हंबरडा फोडला. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. थोड्याच वेळात जवान दीपक यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनात ठेवण्यात आले. तेथून घोषणा देत मोठ्या जनसमुदायासोबत संपूर्ण गावातून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेण्यात आले. या वेळी जिल्हावासीयांच्या वतीने पालकमंत्री विजय शिवतारे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. सैनिक विभाग, प्रशासन व विविध मान्यवरांनीही श्रद्धांजली वाहिली. या वेळी 15 मराठा लाइट इन्फंट्रीचे सुभेदार चंद्रकांत पवार व त्यांच्या बटालियनने बिगुल वाजवून व हवेत बंदुकीच्या दोन फैरी झाडत शासकीय मानवंदना दिली. त्यानंतर जवान घाडगे यांचे वडील जगन्नाथ व त्यांचा मुलगा शंभू यांनी पार्थिवास भडाग्नी दिली.

या वेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सैन्य दलाचे कर्नल आर. एस. सेहल, पंधरा मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे कर्नल एम. डी. मुथप्पा, सैनिक बोर्डाचे कर्नल आर. आर. जाधव, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार स्मिता पवार, साताऱ्याचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, गृह राज्यमंत्र्यांचे स्वीय सहायक राजेंद्र घाडगे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सैनिक बॅंकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम आदी उपस्थित होते.

Web Title: martyr jawan deepak ghadge cremated