हुतात्मा कामटे अद्यापही साताऱ्यात मतदार!

शैलेन्द्र पाटील
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मतदार याद्यांतील घोळ आतातरी थांबवा; प्रभाग तीनमध्ये लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक

मतदार याद्यांतील घोळ आतातरी थांबवा; प्रभाग तीनमध्ये लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक
सातारा - मुंबई दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेले अशोक कामटे येथे 1994 मध्ये पोलिस अधीक्षक होते. सातारा पालिकेच्या मतदार यादीचे पुनर्निरीक्षण करताना "बीएलओ'ला कामटे येथून बदलून जाऊन 20 वर्षे झाल्याचे व आठ वर्षांपूर्वी ते हुतात्मा झाल्याची माहितीच नसावी. कारण अशोक मारुतराव कामटे हे नाव अद्यापही साताऱ्याच्या प्रभाग चारच्या मतदार यादीत आहे. सदरबझारमधील मतदार यादीत अशा अनेक त्रुटी असून त्या पाहिल्यानंतर "बीएलओ' म्हणून नेमलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर नेमके काय कामकाज केले, असा प्रश्‍न उभा राहतो.

पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने काही राजकीय कार्यकर्त्यांसमोर मतदार यादीतील या त्रुटींवर प्रकाश पडला. निवडणुकीची धामधूम संपली, मार्चएण्डला अद्याप अवकाश आहे. त्यामुळे साताऱ्यातील मतदार यादीचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर कराव्यात, अशी अपेक्षा आहे. सदरबझारमधील पोलिस अधीक्षक बंगल्याच्या पत्त्यावर अशोक कामटे यांचे नाव दिसते. त्यांचा मतदार यादीतील सिरियल नंबर 1501 असा आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने (बीएलओ) या त्रुटीतही मोठी त्रुटी ठेवली आहे. कामटे यांच्या नावापुढे 33 वर्षांच्या कोणा युवकाचे छायाचित्र दिसत आहे!

कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात 1995 मध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांची नावे अद्याप मतदार यादीत आहेत. दुबार नावांचा तर याठिकाणी विक्रम करण्यात आला आहे. तब्बल 75 नावे यादीत दुबार आढळली. जिल्हा न्यायालयामागील सरकारी निवास संकुलातील 80 टक्के रहिवाशांची नावे प्रभाग पाचमध्ये आहेत. तर 20 टक्‍के मतदारांची नावे हा प्रभाग फोडून चारमध्ये घुसवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या संकुलातील अनेक मतदार सरकारी सेवेतून निवृत्त होऊन दहा-दहा वर्षे लोटली आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या साताऱ्याबाहेर बदल्या झाल्या. ती नावेही यादीत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयामागील कर्मचारी वसाहतीत हाच प्रकार पाहायला मिळतो. सैनिक स्कूलमध्ये दहा वर्षांपूर्वी काम करून बदलून गेलेल्या व काही निवृत्त झालेल्या प्राचार्य व प्राध्यापकांची नावे अद्याप यादीत आहेत. कनिष्क हॉलसमोरील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत 100 नावे मतदार यादीत दिसतात. प्रत्यक्षात त्यातील सहाच मतदार त्या पत्त्यावर राहात असल्याचे पाहून राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्का बसला.

नव्या म्हाडा कॉलनीतील मतदार प्रभाग चारमध्ये असणे आवश्‍यक होते. यातील 75 टक्के लोकांची नावे लगतच्या प्रभागात घुसडण्यात आली. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, उत्तेकरनगर येथील मतदारांची नावे प्रभाग चारऐवजी सोईप्रमाणे तीन व दोनमध्ये घालण्यात आली. एकाच कुटुंबात असणाऱ्या व एकाच पत्त्यावर राहणाऱ्या सदस्यांची नावे दोन वेगवेगळ्या प्रभागात विभागण्याचे पातक "बीएलओ'ने याठिकाणी केले आहे.
नोकरी-व्यवसाय, निवृत्ती आदींच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानाला आणण्या-सोडण्यासाठी काही उमेदवारांनी खासगी वाहने ठेवली होती. सर्वच उमेदवारांना हे शक्‍य नव्हते. त्यामुळे प्रामाणिकपणे राजकीय काम करणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसला. निवडणूक आयोग जानेवारी महिन्यात मतदार याद्यांचे नूतनीकरण करते. त्याकरिता "बीएलओ'ची नेमणूक केली जाते. अनेक वर्षांपासून काही कोट रुपये खर्च होऊनही या याद्या अद्ययावत व अचूक झाल्या नाहीत. मतदारांच्या पत्त्यावर जाऊन खातरजमा करताना "बीएलओ'नी कोणाची तोंडे पाहून खातरजमा केली, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

प्रभागाच्या लोकसंख्येपेक्षा त्या प्रभागातील मतदारांची संख्या जास्त ठेवण्याचा गंमतशीर प्रकार साताऱ्यातील प्रभाग तीनमध्ये घडला. सहा हजार 86 लोकसंख्येचा हा प्रभाग असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. त्याच आकडेवारीनुसार या प्रभागातील मतदारांची संख्या सहा हजार 91 म्हणजे लोकसंख्येपेक्षा पाच मतदार अधिक असल्याचे सांगते. नेमका घोळ मतदार यादीत आहे, की सरकारी अधिकाऱ्यांच्या डोक्‍यात, असा प्रश्‍न पडतो.

'मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये यंत्रणेवर खर्च केले. वर्षभर मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू होते. "बीएलओ'नी प्रत्यक्ष मतदाराच्या पत्त्यावर जाऊन खातरजमा करणे अपेक्षित होते. निवडणूक आयोगाच्या वतीने एवढी सतर्कता बाळगूनही मतदार याद्या सदोष निघाल्या, त्यामागील गौडबंगाल शोधावे लागेल. निवडणूक आयोगाकडे या संदर्भात याचिका दाखल करणार आहे.''
- शंकर माळवदे,माजी उपाध्यक्ष, सातारा

Web Title: Martyr Kamte still Satara voters!