म्हस्वड : भाविकांना उद्या भुयारातील शिवलिंगाचे दर्शनाची संधी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

रात्री अकरापासून पहाटे पाचपर्यंत भाविकांना दर्शनबारीतून दर्शनासाठी भुयारात प्रवेश दिला जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त भुयारातील शिवलिंगाचे दर्शनासाठी भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन मंदिर ट्रस्टीने जय्यत तयारी केली आहे.  

म्हसवड : महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्‍वरी देवस्थान मंदिरामधील मुख्य गाभाऱ्यामधील "श्रीं'च्या मूर्तीखाली वर्षभर कुलूपबंद असलेल्या भुयारामधील शिवलिंग रात्री दहा वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. वर्षातून एकदाच तेही शिवरात्रीस या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळत असल्यामुळे दूरगावचे प्रत्येक वर्षी शिवरात्रीस सुमारे दहा हजार भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या दर्शनासाठी वाढत्या संख्येने होणाऱ्या गर्दीमुळे यंदा भाविकांसाठी नवीन प्रशस्त बांधकाम केलेल्या दर्शन बारीतून जलद गतीने भुयारात प्रवेशासाठी मंदिर ट्रस्टीने व्यवस्था केली आहे. 

श्री सिद्धनाथ हे काशी विश्‍वेश्‍वरचा अवतार संबोधले जातात. माण नदीच्या काठावर पूर्णत: हेमाडपंथीय दगडी कामाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामातील वेगळे वैशिष्ट्यपूर्ण बांधकामातील म्हणजे मुख्य गाभाऱ्यातील "श्रीं'च्या मूर्तीखाली भुयार आहे. त्यामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. शिवलिंगानजीकच भिंतीस एक गवळचे शिल्पही आहे. या भुयाराचा दरवाजा मंदिराच्या गाभाऱ्यास "श्रीं'च्या मूर्तीलगत आहे. तो पारंपरिक रिवाजानुसार वर्षभर कुलूपबंदच ठेवण्यात येतो. शिवरात्रीस रात्री दहा वाजता या भुयाराचे कुलूपबंद दरवाजे मंदिराचे सालकरी स्वत: उघडतात, ते भुयारात उतरतात. शिवलिंगाची स्वच्छता करून जलाभिषेक पूजा करून परतताच रात्री अकरापासून पहाटे पाचपर्यंत भाविकांना दर्शनबारीतून दर्शनासाठी भुयारात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर पुन्हा हे भुयार कुलूपबंद करतील. महाशिवरात्रीनिमित्त भुयारातील शिवलिंगाचे दर्शनासाठी भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन मंदिर ट्रस्टीने जय्यत तयारी केली आहे. 

हेही वाचा : ठाकरे सरकाराचा भाजपला धक्का; पाणी प्रश्न पेटणार ?

वाचा :  उदयनराजे भाेसलेंचा जनतेस संदेश 

शेंबडीत आज महाशिवरात्री उत्सव 

कास ः शेंबडी (ता. जावळी) येथील विनायकनगर येथे उद्या (ता. 21) गणेश व महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव होणार आहे. सद्‌गुरु नारायण महाराजांच्या मठामध्ये महाशिवरात्री उत्सवानिमित्त उद्या पहाटे चार ते सहा या वेळेत रूद्राभिषेक होणार असून, त्यानंतर पादुकांची पालखी मिरवणूक, प्रवचन व दुपारी एकनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री नऊ ते 11 वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. पहाटे होमहवन व सकाळी पारण्याचा महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल, अशी माहिती दत्त सेवेकरी मंडळाने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mashwad Shivling Darshan Mahashivratri Festival