'त्या' पाच जणांच्या वारसांचा खर्च जमियत उलमा-ए-हिंद करणार

हुकूम मुलाणी
गुरुवार, 5 जुलै 2018

या घटनचे दुःख समोर न ठेवता लहान मुलांच्या भविष्याचा विचार करणे गरजेचे असून मृत नातेवाईकांना कोणीच नाही असे समजू नये. त्यांच्या पाठीशी आमची संघटना राहणार आहे. ही लढाई जाती धर्माची नसून माणूसकीची लढाई असून यातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.

मंगळवेढा : धुळ्यात झालेली हत्याकांडाची घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून त्याला भारतीय इतिहास कधीही माफ करणार नाही. मृत नातेवाईकांच्या पाठीशी जमियत उलमा-ए-हिंद ही संघटना असून मृताच्या वारसांच्या शिक्षणाचा व विवाहाचा खर्च या संघटनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नसीम सिद्दीकी यांनी व्यक्त केले.

धुळे हत्याकांडातील मृत नातेवाईकांच्या सांत्वनासाठी या संघटनेचे पदाधिकारी खवे येथे आले होते. त्यावेळी अ‍ॅड. तैवरखान पठाण, जिल्हाध्यक्ष मौलाना इव्राहीम कासमी, युन्नुस डोणगावकर, हाफीज युसुफ अब्दुल शुकूर खलिफा, हसीब नदाफ, रफिक इनामदार, हाफीझ रियाज, हाजी सलीम बागवान, बासु शेख,मिराभाई सुतार, रमीझराजा मुल्ला, अय्युब   मुल्ला, तस्लीम आंकुजी, आसीफ शेख, हाफीझ आरीफ, आदम शेख, जाहीद बागवान, रिहान बागवान, फारुख खाटीक, यासीन बागवान मच्छिद्र भोसले, भैरु भोसले, सुखदेव भोसले, मारुती भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तातडीची मदत म्हणून पाच कुटूंबाला प्रत्येकी दहा हजाराचा धनादेश देण्यात आला.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सिद्दीकी म्हणाले, की या घटनचे दुःख समोर न ठेवता लहान मुलांच्या भविष्याचा विचार करणे गरजेचे असून मृत नातेवाईकांना कोणीच नाही असे समजू नये. त्यांच्या पाठीशी आमची संघटना राहणार आहे. ही लढाई जाती धर्माची नसून माणूसकीची लढाई असून यातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. प्रसंगी न्यायालयीन लढयासाठी वकील देण्याची तयारी असून या समाजातील शिक्षित तरुणांनी सोबत येण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सिददीकी यांनी यावेळी बोलताना केले.

Web Title: mass murder in Dhule jamiyat ulma a hind take responsibility