अँटिक गाड्यांच्या दुरुस्तीतला हा ‘सिकंदर’

संदीप खांडेकर
रविवार, 1 डिसेंबर 2019

अनेक जुन्या अँटिक गाड्यांना चकचकीत करणारा हा अवलिया... धूळ खाणाऱ्या लॅब्रेडा, लक्ष्मी गाड्यांचं इंजिन यांनी धडधडतं केलं...

कोल्हापूर - सिकंदर अब्बास मकानदार स्क्रॅप गाड्यांच्या दुरुस्तीत मास्टर. धूळ खाणाऱ्या लॅब्रेडा, लक्ष्मी गाड्यांचं इंजिन यांनी धडधडतं केलं. गॅरेजमध्ये आलेल्या पंधरा-सोळा लक्ष्मी गाड्यांचे जोडकाम यांनी भारी जमवलं. डोळ्यांत तेल घालून काम करण्याच याच तंत्र. वयाच्या चौऱ्याहत्तरीत आजही हाताला आराम नाही. कसबा बावड्यातल्या घराच्या दारात हातात पान्हे घेऊन सिकंदरअब्बा गाड्या ठीकठाक करण्यात गुंतलेले दिसतात. सिकंदर अब्बांचे वडील बागवान गल्लीतले फळविक्रेते. बेताच्या आर्थिक स्थितीमुळे ते अब्बांना फारसे शिकवू शकले नाहीत. अब्बांनी स्वकर्तृत्वाने शिक्षणातील कमी मेकॅनिक होऊन भरून काढली. त्यांनी दुरुस्त केलेल्या जुन्या गाड्यांवर नेत्यांनाही फेरफटका मारण्याचा मोह आवरता आला नाही. अब्बा यंदा ‘मेकॅनिक’ क्षेत्रातलं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं करताहेत. 

गॅरेजमध्ये मेस्त्रीच्या कामापासुन सुरवात

सिकंदर अब्बा शेलाजी वन्नाजी विद्यालयात पाठीला दप्तर अडकून जात होते. वर्गातलं शिक्षण डोक्‍यात फारसं घुसत नव्हतं. शाळा बदलून शेठ रुईया विद्यालयात त्यांचा दाखला जोडला गेला. सहावीपर्यंत शिकणं त्यांच्या नशिबी होतं. शाळेची दोरी कापल्यानंतर वसंतराव यादव व जानकर मेस्त्रींच्या गॅरेजमध्ये काम मिळालं. दुचाकी गाड्यांच्या दुरुस्तीचं काम त्यांच्या डोक्‍यात साठत गेलं. पान्हे घेऊन त्यांचे हातही दुरुस्तीत गुंतले. हरतऱ्हेच्या गाड्यांच इंजिन समजून घेणं सोप नव्हतं. गाड्यातील वायरिंग जंजाळ कोष्टकाच्या जाळ्याप्रमाणं. ते उमजून घेण्यात अब्बांनी कसूर केली नाही.

काय सांगता, चक्क... बत्तीस सेकंदांत फेटा बांधणारा कोल्हापुरी तरुण
 

दि फ्रेंडस ॲटो सायकल गॅरेज थाटलं

बिंदू चौकातील सबजेलच्या बाजूला त्यांनी १९६९ ला दि फ्रेंडस ॲटो सायकल गॅरेज थाटलं. कमाई पोटापुरती मिळत होती. अब्बांच्या कुटुंबाचा डोलारा मोठा. चौघा भावांनी १९७२ ला बावड्यात घरं खरेदी केली. मोठ्या घरात बिऱ्हाड हलवलं. अब्बांच बावड्यातून गॅरेजमध्येयेऊन काम करणं सुरूच राहील.

 

राजदूत, जावा, स्कूटर या गाड्यांनाही केलं ठीकठाक 

पेट्रोलवर चालणाऱ्या लक्ष्मी गाड्यांच फॅड मोठं होत. प्रति किलोमीटर सुमारे चाळीस ते पंचेचाळीस गाडीला अॅव्हरेज. वजनानं अधिक असलेल्या लॅब्रेडाचं दुरुस्तीचं काम कठीण. अब्बांचा या गाड्या दुरुस्त करण्यात हातखंडा. शाहूपुरीतल्या काटे यांच्याकडे लक्ष्मी गाडी होती. नादुरुस्त झाल्याने तिचे पार्ट पोत्यात बांधून ठेवले होते. टेंपोतून ते अब्बांच्या घरी पोच करण्यात आले. दिवस-रात्र एक करून अब्बांनी पार्टची जोडणी केली. इंजिन घासून-पुसून साफ करत त्याला जिवंत केलं. व्हॉट्स ॲपवर लक्ष्मीचं देखणं रूप बावड्यात फिरलं. घरात धूळखात पडलेल्या गाड्यांचे मालक अब्बांना शोधत आले. पंधरा-सोळा गाड्यांच काम बिनदिक्कत त्यांनी पूर्ण केलं. दोन महिन्यांत गाडीचं जोडकाम करून तिला रंग चढविण्यात आला. शिवराज पाटील यांच्याकडचं लक्ष्मीचं ६०चं मॉडेललाही त्यांचा हात लागला. अब्बांनी राजदूत, जावा, स्कूटर या गाड्यांनाही ठीकठाक केलं. 

हेही वाचा - डोक्‍याने नारळ फोडणारे हे कोल्हापुरी राॅकेट आण्णा...

मुलगा अस्लमनं अब्बांच्या पावलावर पाऊल ठेवलंय. बारावीपर्यंत शिक्षण घेऊत तो त्यांच्या हाताखाली मेकॅनिक झालाय. घराच्या दारातच त्याचही गाड्या दुरुस्तीचं काम सुरू असतं. धाकटा इम्तियाजचं घोड दहावीपर्यंत धावलं. शाळा सुटल्यानंतर तो ड्रायव्हर म्हणून काम करतोय. अब्बांच्या कामाबद्दल दोघांच्या मनात आदर आहे. यंदा ते मेकॅनिक म्हणून सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहेत. याचही त्यांना मोठ समाधान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Master in the Repair of Antique bikes