मसूरमध्ये भाजपची तलवार अखेर म्यान

Masur-Politics
Masur-Politics

मसूर - कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या उत्पन्नाच्या मसूर ग्रामपंचायतीवर सत्तेचा झेंडा फडकवण्यासाठी ‘हम किसी से कम नही...’असा शड्डू ठोकत दोन पॅनेल समोरासमोर ठाकली आहेत. लोकनियुक्त ओबीसी राखीव सरपंचपदासाठी सहा उमेदवार नशीब आजमावत आहेत. लढतीत अपक्षांनीही उडी घेतली आहे. बहुचर्चित भाजपने तलवार म्यान केल्याने भाजपचा फुगा लढतीअगोदरच फुटला आहे.

मसूरसारख्या निमशहरी गावाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मतदारांवर प्रभाव पडणार अशा मुद्यांना विचारात घेत जनशक्ती पॅनेल व मसूर नागरिक पॅनेल या दोन पॅनेलच्या प्रमुखांनी निवडणुकीच्या लढतीत एकमेकांसमोर आव्हान उभे करण्यास सुरवात केली आहे. त्यात नवमतदाराला खेचून आणण्यासाठी दोन्ही पॅनेल काय नीती अवलंबणार, हे पाहणे देखील औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

मुख्यतः उमेदवारीत स्थान न मिळाल्याने इच्छुकांच्या उद्‌भवलेल्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी व सतर्कता पॅनेल प्रमुखांना दाखवावी लागणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांनी मनोमिलनाद्वारे जनशक्ती पॅनेलची उभारणी केली आहे, तर कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे यांचे मसूर नागरिक पॅनेल या निवडणुकीच्या लढतीत आहे. लढतीत भाजपचे जयवंत जगदाळे यांनी पॅनेलची उभारणी करणार असल्याचे स्पष्ट करत समविचारी लोकांशी हातमिळवणी करणार असल्याचेही सूचित केले होते. मात्र, त्यांना कुणी विचारात न घेतल्याने सरपंचपदासह भाजपला पॅनेलची उभारणी न करता आल्याने निवडणुकीअगोदरच त्यांचा फुगा फुटला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण गरमागरम आहे. महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात असावी, यासाठी आटापिटा सुरू झाला आहे. हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याअगोदरच उमेदवाराच्या हरकतीची किनार या निवडणुकीला आहे. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे काही जण दुखावले देखील आहेत. यात नेतेमंडळींना राजकीय कौशल्य वापरावे लागणार आहे. तीन वगळता नवीन चेहऱ्यांना निवडणुकीत संधी लाभली आहे. एकूण सहा प्रभाग आहेत. एकूण १७ जागांसाठी लढत आहे. दोन अपक्षांसह ३६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकनियुक्त सरपंचपदासाठी दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी एक व अपक्ष असे सहा जण रिंगणात आहेत.

निवडणुकीवर प्रभाव टाकणारे मुद्दे
  पिण्याच्या पाण्याचा जलकुंभ
  गावाची पेयजल योजना
  गावातील काही अंतर्गत रस्ते
  बहुतांशी अपूर्ण गटार कामे 
  मसूर-उंब्रज रस्त्याकडील गटार बांधकाम
  विविध नागरी सुविधांविषयी अनास्था.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com