माथेरानच्या आदिवासींची बिकट वाट सुकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

धोकादायक दरीतून ये-जा करण्यासाठी लोखंडी शिडी

धोकादायक दरीतून ये-जा करण्यासाठी लोखंडी शिडी
माथेरान - माथेरानलगतच्या आदिवासी वाड्यांतून माथेरानमध्ये पोटापाण्यासाठी येणाऱ्या आदिवासींना बिकट पायवाटा तुडवाव्या लागतात. शार्लोट लेकजवळील धोकादायक दरीत लाकडी शिडी चढून जाव्या लागणाऱ्या अशाच बिकट पायवाटेवर आता प्रशस्त लोखंडी शिडी बसवल्याने आदिवासींचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. यासाठी माथेरानमधील एका हॉटेल उद्योजकाने पुढाकार घेतला.

माथेरानच्या डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या आदिवासींना उदरनिर्वाहासाठी माथेरान हेच मुख्य ठिकाण आहे. डोंगरातून येणारी पायवाट हाच त्यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग. शार्लोट लेकच्या पश्‍चिम भागात एक अत्यंत कठीण पायवाट डोंगरातून वर येते. वर्षानुवर्षे आदिवासी याच वाटेने माथेरानला येतात. डोक्‍यावर गवताचा भारा किंवा रानमेवा घेऊन चरितार्थासाठी त्यांना याच वाटेने माथेरान गाठावे लागते. या ठिकाणी खोल दरीत एका ठिकाणी ही पायवाट संपते. तेथून वर येण्यासाठी पूर्वी एक लाकडी शिडी असे. दरीत लटकलेल्या शिडीच्या आधारे हे आदिवासी ये-जा करत.

या ठिकाणी नवीन शिडी बांधण्यात आली; मात्र काही वर्षांनी तिची दुरवस्था झाल्याने आदिवासींना जीव मुठीत घेऊनच दरीतून ये-जा करावी लागत असे. ही बाब माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक उमेश दुबल यांना समजल्यावर त्यांनी या जागी एक प्रशस्त लोखंडी शिडी स्वखर्चाने बांधून दिली आहे. माथेरानमधील चंद्रकांत सुतार यांनी या अवघड शिडीचे बांधकाम पूर्ण केले आहे. यामुळे आदिवासींना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

आधीच्या धोकादायक झालेल्या 15 फुटी शिडीच्या जागी ही नवीन 49 फुटी लोखंडी शिडी बांधण्याचे अत्यंत अवघड काम आम्हाला देण्यात आले होते. ते आम्ही महिनाभरात पूर्ण केले आहे.
- चंद्रकांत सुतार, माथेरान.

Web Title: matheran news tribal development