पैशांपेक्षा माऊलीचा जीव वाचल्याचा आनंद : धनाजी जगदाळे 

विशाल गुंजवटे
Sunday, 3 November 2019

ई - सकाळने धनाजींचा प्रामाणिकपणा जगासमोर आणल्यानंतर अमेरिकेत माझ्या मित्रमंडळींना हे दाखवताना मला अभिमान वाटला. आजही प्रामाणिक लोक आहेत. त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी मानून मी धनाजींना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. 
राहुल बर्गे, मूळ कोरेगाव सध्या राहणार अमेरिका.

बिजवडी : मनाने धनवान असलेल्या धनाजी जगदाळे यांचा प्रामाणिकपणा  "सकाळ'मुळे देशाबरोबरच सातासमुद्रापार पोचला. त्यानंतर त्यांना अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केले. मात्र, ही लाखोंची मदतही त्यांनी नम्रपणे नाकारली. अमेरिकास्थित कोरेगावचे रहिवाशी राहुल बर्गे यांनी पाच लाख व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दिलेले एक लाखाचे बक्षीसही त्यांनी नाकारले. त्याचबरोबर अन्य व्यक्तींनीही दिलेली बक्षीसही त्यांनी परत केली.

धनाजी यांना घरी जाण्यासाठी सात रुपये नसताना दहिवडीतील बस स्थानकात 40 हजार रुपये सापडतात. ज्याचे होते त्याला ती रक्कम ते परत करतात अन्‌ बक्षीस म्हणून त्यांच्याकडून प्रवासासाठी फक्त सात रुपये घेतात. धनाजींच्या प्रामाणिकपणाची बातमी सकाळ आणि ई -सकाळच्या माध्यमातून वाचली. ही बातमी वाचून धनाजींबद्दल अनेकांना कुतूहल वाटले. त्यातून अनेक संस्था, संघटनांबरोबर व्यक्तिशः अनेकांनी त्यांचा सत्कार केला.

त्यापैकीच राहुल बर्गे हे एक. भारतीय वंशाचे राहुल हे मूळचे कोरेगावचे. माजी प्राचार्य अरुण बर्गे यांचे ते चिरंजीव. अमेरिकेतील कॉलेर्डो शहरात ते अनॅलिस्ट म्हणून नोकरी करतात. धनाजीची त्यांनी बातमी वाचली. प्रामाणिकपणाचे कौतुक करावे म्हणून धनाजींना एक महिन्याच्या पगाराची 5 लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्याची इच्छा व्यक्त करताना त्यांनी त्यांचा बॅंक अकाउंट नंबर मागितला; पण धनाजींनी हे बक्षीसही नाकारले. मला पैसे नकोत, तुमच्या शाबासकीची थापच पुरेशी आहे, असे म्हणणाऱ्या धनाजींनी पुन्हा एकदा मनाचा मोठेपणा दाखवला.

अमेरिकेत काम करताना आपल्या मातीतील व्यक्तीच्या कार्याची दखल घेत त्यांना त्या कार्याबद्दल प्रोत्साहन देत 5 लाख रुपये पगार देण्याची इच्छा व्यक्त करणारे राहुल बर्गेंची बांधिलकीही दाद देण्यासारखी आहे.

 

दरम्यान, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर (सातारा) येथे धनाजींचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले यांनीही "सुरुची' बंगल्यात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. सोबत एक लाख रुपये मदत देऊ केली; पण धनाजींनी "मला मदत नको. मी फक्त आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे,' असे सांगितले.

जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पोलिस मुख्यालयात धनाजींचा सन्मान केला. आजच्या काळात अशा लोकांची गरज आहे. पोलिस दलामार्फत आपला हा सन्मान म्हणजे एका देवदूताचा सन्मान आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले. लातूर येथील ग्लोबल नॉलेज कॉलेजचे संस्थापक रमेश बिरादार हे धनाजींना भेटून गेले. "लातूर पॅटर्न'मार्फत धनाजींना त्यांनी सन्मानित करताना 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले; पण तेही त्यांनी नाकारले.
 
युवा नेते ऍड. नितीन भोसले यांच्या पुढाकाराने सातारा शहरात विविध ठिकाणी धनाजींचा सत्कार करण्यात आला. धनाजी हे पैसे घेत नाहीत म्हणून अनेकांनी दिवाळी फराळ, मिठाई त्यांना भेट दिली; पण तीही त्यांनी लहान मुले, ग्रामस्थांना वाटून टाकली. माण, खटाव तालुक्‍यांतील विविध संस्था, पदाधिकारी, नेत्यांसह नागरिकांनी धनाजींचा सत्कार केला. कीर्तनकार सागर बोराटे-महाराज यांनी धनाजींना भेटून त्यांचे अभिनंदन केले. प्रा. नीलेश कोरडे-महाराज यांनी आळंदीत धनाजींवर कीर्तन सेवा दिली. हुतात्मा जवान दिनकर नाळे यांच्या वीरपत्नी अर्चना यांनी भाऊबीज देऊन धनाजींचा सन्मान केला. 

धनाजींबद्दल ग्रामस्थांनाही कुतूहल
 
जन्मल्यापासून आई-वडिलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती धनाजींना वाढवले. आज ते या जगात नाहीत. धनाजींचा मुलगाही या जगात नाही. ते एकटेच राहतात. त्यांच्या गरजा खूप कमी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मोह नाही. धनाजींमुळे गावाचा लौकिक वाढला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असताना गावाचेही कौतुक झाले. आज गावातील प्रत्येक नागरिक धनाजींकडे आपुलकीने पाहू लागला आणि बघता-बघता धनाजी हे लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेत. 

 

"सकाळ' ने मला देशभरासह सातासमुद्रापार नेले. मी परत केलेल्या पैशांमुळे एका माऊलीचे जीव वाचले, यातच मला सर्व काही मिळाले. मला सत्कारादरम्यान अनेकांनी बक्षीस म्हणून पैसे देण्याचा प्रयत्न केला; पण मी ते नाकारले. दुसऱ्याचे पैसे घेऊन समाधान मिळत नाही. लोकांनी प्रामाणिक जगावे एवढाच संदेश समाजापर्यंत जावा, हीच अपेक्षा. 
-  धनाजी जगदाळे, पिंगळी बुद्रुक (ता. माण) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maulie's Survival Happiness Than Money says honestly Dhanaji Jagadale