म्हारवंडवर भूस्खलनाची टांगती तलवार

म्हारवंडवर भूस्खलनाची टांगती तलवार

तारळे : म्हारवंड (ता. पाटण) या गावावर गेल्या काही वर्षांपासून भूस्खलनाची टांगती तलवार कायम आहे. सोसाट्याचा वारा व धो-धो पाऊस लोकांचा थरकाप उडवत आहे. कुठून तरी पाण्याचा लोट येईल, अन्‌ गाव धुवून नेईल, अशा भीतीने गावाला अक्षरशः पछाडले आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या नावाने जनता टाहो फोडत रात्र रात्र जागून काढत असून, माळीणसारखी एक रात्र आमची काळरात्र ठरेल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. 

येथून 22 किलोमीटरवर डोंगरकपारीत 80 कुटुंबांचे म्हारवंड गाव आहे. गावात साधारण 500 आबालवृध्द वास्तव्यास आहेत. म्हारवंड परिसरात कायम अतिवृष्टी असते. गावाच्या सभोवताली उंचच उंच डोंगरकडे आहेत. सततच्या पावसाने यास तडे गेले असून जमिनी भेगाळल्या आहेत. सातत्याने जमीन खचण्याचा प्रकार घडत आहे. पावसाच्या पाण्याबरोबर झाडे, दगड, चिखल गावाच्या दिशेने वाहून येण्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. यंदाही त्याची पुनरावृत्ती सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेला पाऊस अजून थांबलेला नाही. पाणी डोंगरकड्यात मुरून आता वाहू लागले आहे. माती घसरून खाली येत आहे. 

अनेक वर्षांपासूनची म्हारवंड ग्रामस्थांची पुनर्वसन करण्याची मागणी आहे. या मागणीला प्रशासनाने जुजबी कारवाई करत पाने पुसण्याचे काम केले आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींची हरवलेली संवेदनशीलता ग्रामस्थांच्या मनाला वेदना देणारी ठरत आहे. माणुसकी या नात्याने तरी आमचा विचार करावा, अशी भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी एक रात्र आमच्यासोबत गावात राहून दाखवावे, असे आवाहन येथील लोक करत आहेत. 

महाकाय दगड वाढवतोय धडधड 

मागील आठवड्यात एक मोठी दरड गावाकडे झेपावली होती. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. तर एक महाकाय दगड गावाच्या छाताडावर धडधड वाढवत आहे. गावापासून अवघ्या 50 मीटरवर मोठा कडा सुटला आहे. तेथून एकसारखी माती निसटत आहे. हा कडा कधीही कोसळेल, अशी स्थिती आहे. या भीतीने ग्रामस्थ गर्भगळीत झाले असून, जागता पहारा देण्याचे काम सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com