पाणलोट विकासकामांचा मायणी तलावाला फटका

संजय जगताप
रविवार, 16 एप्रिल 2017

मायणी - इंग्रज राजवटीतील प्रसिद्ध मायणी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. गावोगावी पाणलोट विकासाची कामे झाली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली. तद्वत, पावसाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. परिणामी मायणी तलावात ऐन पावसाळ्यातही पाणी येईना. त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांना बसत आहे. पाणीटंचाईत दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे.

मायणी - इंग्रज राजवटीतील प्रसिद्ध मायणी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. गावोगावी पाणलोट विकासाची कामे झाली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली. तद्वत, पावसाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. परिणामी मायणी तलावात ऐन पावसाळ्यातही पाणी येईना. त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांना बसत आहे. पाणीटंचाईत दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे.

इंग्रज राजवटीतील मायणी तलाव सध्या ठणठणीत कोरडा पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागातील पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. जेमतेम ३०० ते ३५० मिलिमीटर पाऊस पडत आहे. उन्हाळी पाऊसही पूर्ण दडी मारू लागला आहे. त्यामुळे त्या भागातील तलाव, पाझर तलाव, बांध, बंधारे पावसाळ्यातही कोरडेच असलेले दृष्टीस येत आहेत. पावसाच्या पाण्याचा थेंब ना थेंब त्या-त्या ठिकाणी अडवण्याच्या हेतूने गावोगावी पाणलोट विकासाची कामे झाली आहेत. काही ठिकाणी सुरू आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ठिकठिकाणी बांध घातले आहेत. बंधारे बांधण्यात आले आहेत. साखळी बंधाऱ्यांची योजना राबवली आहे. बंधाऱ्यांतील गाळ काढून, ओढे- नाल्यांचे खोलीकऱण कऱण्यात आले आहे. प्रत्येक गावच्या शिवारात अधिकाधिक पाणीसाठा होण्यासाठी सर्वतोपरी उपक्रमांची, योजनांची राबवणूक करण्यात आली आहे. मात्र, पावसाचेच प्रमाण कमी झाल्याने पाणीसाठवण क्षमता वाढूनही ती निरुपयोगी ठरत आहे. 

मायणी तलाव हे या भागातील सर्वाधिक जलसाठ्याचे ठिकाण आहे. सुमारे १०० चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र असूनही तलाव ऐन पावसाळ्यातही कोरडाच दृष्टीस येत आहे. कान्हरवाडी (ता. खटाव) ते कुक्कुडवाड खिंड, पाचवडचा डोंगर व पुढे तरसवाडी डोंगरघाट ते गारळेवाडी या पट्ट्यात पडलेले पावसाचे पाणी मायणी तलावापर्यंत पोचतच नाही. तलाव ते पाणलोट क्षेत्रातील घाटमाथ्यापर्यंत ठिकठिकाणी पाणी अडवण्याचे प्रयत्न झाले आहेत. बांध, बंधारे, पाझर तलाव आदी भरल्यानंतर पाणी तलावाच्या दिशेने येण्यास सुरवात होते. मात्र, पाणलोट क्षेत्रातील बांध-बंधारेच पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने मायणी तलावात पाणी येणार कुठून? परिणामी तलाव कोरडा पडत आहे. भूजल पातळीत घट होत आहे. त्यामुळे तलावाखालील विहिरी, कूपनलिका व हातपंपही पाण्याविना निरुपयोगी ठरत आहेत. ठिकठिकाणी सुमारे ५०० ते हजार फूट खोल कूपनलिका घेवूनही पाण्याविना नुसताच पैसा खर्च होत आहे. तलाव कोरडा पडल्यानंतर विहिरींच्या पाण्याला वेगाने ओहोटी लागत आहे. त्यामुळे विहिरींवर अवलंबून असणारी शेती अडचणीत येत आहे. 

शेतीपाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्याचबरोबर खासगी विंधनविहिरींचे पाणीही झपाट्याने कमी होत जाऊन त्या अखेर बंद पडत आहेत. ठिकठिकाणच्या सार्वजनिक हातपंपांना तासाभरात एखादी कळशी पाणी येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईत दिवसेंदिवस वाढच होत आहे. कोणत्याही परिस्थितीत मायणी तलावात पाणी असणे हेच मायणीकरांसाठी महत्त्वाचे असते. तलावात पाणी तर हातात मनी (पैसा) असेही अनेकजण म्हणत असतात. जागोजागी झालेले बंधारे व पाणलोट विकासकामांमुळे पावसाचे पाणी तर तलावात येऊ शकत नाही. त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. उत्पन्नात घट होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी टेंभू योजनेचे पाणी मायणी तलावात आणणे हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राज्यकर्ते निवडणुकीपुरता पाणीप्रश्न उकरून काढत असतात. तसे न करता सर्वांनी राजकीय, व्यक्तिगत अभिनिवेष बाजूला ठेवून टेंभूच्या पाण्यासाठी सातत्याने लढा उभारणे आवश्‍यक आहे. 

‘‘जलसंधारण व पाणलोट विकासाची कामे गावोगावी झाल्यामुळे जिथल्या तिथे पाणी अडवले जात आहे. पूर्वीसारखे थेट तलावात पाणी येत नाही. पर्जन्यमानही कमी झाले आहे. ’’ 
- प्रा. डॉ. उत्तम टेंबरे, पाणलोट विकास कार्यक्रमाचे अभ्यासक, मायणी

‘‘टेंभू योजनेच्या पाण्याशिवाय मायणीकरांना सत ना गत. किती वर्षे झाली, नेते मंडळी टेंभूच्या पाण्याचे गाजर दाखविणार आहेत कुणास ठाऊक ?’’ 

-दिनकर थोरात, शेतकरी, मायणी 

Web Title: mayani lake hit by watershed development