डाळिंब उत्पादकांचे मोडले कंबरडे

संजय जगताप
शुक्रवार, 14 जुलै 2017

पाण्याअभावी रोगांचा प्रादुर्भाव; दर नाही, ७० टक्के माल गेला वाया

पाण्याअभावी रोगांचा प्रादुर्भाव; दर नाही, ७० टक्के माल गेला वाया

मायणी - पाण्याअभावी खटाव तालुक्‍यातील ठिकठिकाणच्या डाळिंब बागा वाया गेल्या आहेत. अनेक बागा वाळून गेल्या तर मोठ्या कष्टाने जगवलेल्या बागांतील डाळिंबांना विविध रोगांनी कवटाळले आहे. त्यामुळे ६० ते ७० टक्के माल टाकूनच द्यावा लागत आहे. तीन लाख खर्च करून हातात ३० हजार रुपयेही पडत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे.   
पुरेशा पाऊस-पाण्याअभावी खटाव तालुक्‍यातील शेती व पीक पद्धतीत सातत्याने शेतकरी विविध प्रयोग करीत आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लावण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. धान्य पिकवण्यापेक्षा फळबागा व तरकारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अर्थात त्यासाठीही पाण्याची गरज आहेच. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची चाळण केली आहे. एका बोअरचे पाणी कमी आले की दुसरी बोअर घेतली जात आहे. दुष्काळाशी दोन हात करण्याचे त्यांचे प्रयत्न सतत सुरूच आहेत. त्यातूनच शेतकरी विविध पिकांचे प्रयोग करीत आहेत. चितळी, मायणी, कलेढोण पट्ट्यात डाळिंब, पेरू, पपई, बोर, सीताफळ व द्राक्षबागांची संख्या वाढू लागली आहे. स्थानिक सोसायटीसह विविध वित्तीय संस्थांचे कर्ज काढून शेतकरी शेती करीत आहेत. फळबागांची लागवड करीत आहेत.

मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या त्या बागा पाण्याअभावी मोडकळीस आल्या आहेत. तालुक्‍यातील डाळिंब बागांचे मालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. विविध रोगांनी बागांना तडाखा दिला आहे. कुजव्या, तेल्या रोगांमुळे अनेक बागांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ६० ते ७० टक्के फळे रोगामुळे निरुपयोगी झालेली आहेत. त्याचे ठिकठिकाणी खच पडलेले दृष्टीस येत आहेत. वरून चकचकीत असलेली डाळिंबे आतून खराब झाली आहेत.

त्यामुळे डाळिंब व्यापारीही मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांच्या हातापाया पडून मिळेल तो दर घ्यावा लागत आहे. सध्या १८ ते २२ रुपये किलो दराने डाळिंबाची मागणी व्यापारी करीत आहेत. तेही सरसकट न नेता तोड केलेल्या डाळिंबातून चांगला शेलका मालच तेवढा बाजूला काढला जात आहे. त्यामुळे सुमारे ७० टक्के डाळिंबे फेकून द्यावी लागत आहेत. 

भगवा जातीच्या डाळिंबाची एक एकराची बाग आहे. ४२५ झाडे आहेत. तीन लाख रुपये खर्च केला आहे. मात्र, डाळिंब विकून ३० हजार रुपयेही मिळाले नाहीत. पाण्याचा प्रश्न गहन आहे. पाणी आणायचं कुठून. जमिनीतच पाणी नाही आणि पावसाचा अजून पत्ता नाही. त्यामुळे शेती करणेच अवघड झाले आहे.
- तानाजी पवार, संजय पवार, डाळिंब उत्पादक शेतकरी,  चितळी, ता. खटाव

Web Title: mayani satara news pomegranate loss